
वादग्रस्त कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून आग्रही मागणी होत आहे. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली होती.
त्यावर कोकाटे यांच्याबाबत मंगळवारी निर्णय घेण्यात येईल असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यात भाजप पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेतल्या. यातही कोकाटे यांच्याबद्दल चर्चा झाली असल्याची माहिती आहे.
अशातच आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हेही मैदानात उतरले आहेत. शरद पवार एक ते दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून ख्रिश्चन समाजाविषयी घेतली जाणारी वादग्रस्त भूमिका, विधिमंडळात झालेली हाणामारी, माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अशा विषयांवर ही भेट असल्याचे सांगण्यात येते.
नुकतेच आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आणि विधिमंडळात मारहाण झालेले नितीन देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत गोपीचंद पडळकर यांचे संबंधित ऋषिकेश टकले आणि देशमुख यांच्यात काय घडलं याची माहिती देण्यात आली होती. याशिवाय रोहित पवार यांनीही मागील काही दिवसात कोकाटे यांच्याबद्दल आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याबद्दलही शरद पवार फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
संजय राऊत यांचीही टीका :
फडणवीस सरकारमधील मंत्र्यांवर संजय राऊत यांनीही टीका केली आहे. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील 75 टक्के मंत्री युजलेस आहेत, ते मंत्री म्हणून काम करीत नाहीत ते दरोडेखोर म्हणून काम करतात. एक मंत्री मारहाण करतो, एक मंत्री रमी खेळतो, एक सिगारेट ओढत पैशांच्या बॅगा भरतो, एका मंत्री डान्सबार चालवतो, अशी टीका राऊत यांनी केली आहे.