
यवतमाळमधील घटनेने खळबळ !
राजकीय वैमनस्यातून वचपा काढण्यासाठी चक्क विरोधकांच्या घराभोवती रात्रीदरम्यान तारा बांधून त्यात वीज प्रवाह सोडण्यात आला. यात एक 37 वर्षीय महिलेचा विजेच्या धक्क्याने जागी मृत्यू झाला.
या घटनेने मोठी खळबळ उडाली. तर मृत महिलेचा पती यात जखमी झाला ही घटना यवतमाळच्या घाटंजी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अंजी नाईक येथे घडलीये. या घटनेने खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात धाव घेतली.
गावात दंगल नियंत्रण पथक दाखल
सविता पवार असे करंट लागून मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. तर मनेश पवार असे जखमी पतीचे नाव आहे. मिळालेली अधिक माहिती अशी की, घराला करंट लावून जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप मृतकाचे काका दत्ता पवार यांनी केला आहे. मृत महिलेच्या पतीने घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेने ग्रामस्थ देखील हैराण झाले आहेत.
6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल राजकीय वादातून कृत्य
गावात अनुचित घटना घडू नये, यासाठी गावात दंगल नियंत्रण पथक आणि पोलिस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला. या प्रकरणी घाटंजी पोलिसांनी मनेश देवराव पवार याच्या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी इंदल मोतीराम राठोड, सुदाम जयराम चव्हाण, गणेश केशव राठोड, विनोद रामकृष्ण चव्हाण, राजू कवडू जाधव, चेतन निवृत्ती चव्हाण या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेनंतर घाटंजी पोलिसांनी दोघांना अटक केली.
बेशुध्द अवस्थेत सविता यांना रूग्णालयात करण्यात आले दाखल
शुक्रवारी रात्री जेवणानंतर पवार कुटुंब घरामध्ये झोपले होते. यावेळी पहाटेच्या दरम्यान सविता या नैसर्गिकविधीकरीता उठल्या असता बाहेर जात असताना त्यांच्या पायाला करंट लागले. त्यांना करंट इतक्या जोरात लागला की, त्या पडल्या. यानंतर त्यांनी आरडाओरड केली आणि परिसरातील नागरिक जमा झाले. बेशुध्द असलेल्या सविता यांना परिसरातील नागरिकांच्या मदतीने शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर सविता हीचा करंट लागून मृत्यू झाल्याचे सांगितले.