
राऊत भाजपच्या ‘ट्रॅप’वर तुटून पडले !
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावयच्या पुण्यातील रेव्ह पार्टीवर राज्यातील राजकारण तापले असताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकारावर वेगळीच शंका घेतली आहे.
भाजप महायुती सरकार पोलिसांचा वापर करून घेत असून, निःपक्षपणे चौकशी होऊ द्या. सत्य काय आहे समोर येईल. परंतु तसे हे सरकार होऊ देणार नाही, असा आरोप करताना भाजपचे लोक सत्तेसाठी विरोधकांच्या कुटुंबापर्यंत पोचू लागल्याचे गंभीर निरीक्षण संजय राऊत यांनी नोंदवले.
महायुती सरकारच्या, अशा कारभाराचे वाभाडे काढताना, एकनाथ खडसेंच्या जावयाबरोबरच नवाब मलिक यांचा जावयावरील कारवाई, अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन याचे ड्रग्स प्रकरण आणि अहिल्यानगरमधील शिवसेनेचे शहरप्रमुख किरण काळे यांच्या बलात्काराच्या प्रकरणापर्यंत संजय राऊत यांनी सर्वच काढले.
संजय राऊत यांनी भाजपवर (BJP) टीका करताना म्हणाले, “महाराष्ट्रातील राजकारणात आम्ही पथ्य पाळतो. कुटुंबापर्यंत आम्ही पोचलो नाही. दुर्दैवाने भाजपचे लोक कुटुंबापर्यंत पोचू लागले आहे. एकनाथ खडसे गेल्या तीन दिवसांपासून हनी ट्रॅपवर बोलत होते. काही लोकांना अटक केली आहे. त्यांची नीट चौकशी करण्याच्या सूचना आहे. गिरीश महाजन यांच्या सहभागाविषयी बोलत आहेत. त्याच्यावर तपास नाही, त्याच्यावर रेट पडत नाही. पोलिसांना त्यासंदर्भात जाग नाही. एकनाथ खडसे बोलताय, म्हणून खडसेंच्या जावयाला असं उचललं.