
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लॅन…
आज वर्ध्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा जाहीर केल्या.
या घोषणांमुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. फडणवीसांनी यावेळी शेतकऱ्यांसाठीचा आपला मास्टर प्लॅन जाहीर केला.
1) दुष्काळ इतिहासात जमा होणार
विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये ‘नानाजी कृषी समृद्धी योजना’ लागू करण्यात येणार आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी असून, लाभार्थ्यांवर इष्टांक लादला जाणार नाही. “हवी त्याला योजना” हीच योजनेची विशेषता असून, अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ मिळणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
2) शेतीमध्ये दरवर्षी 5 हजार कोटींची गुंतवणूक
राज्य सरकार शेतीत गुंतवणूक वाढवण्यावर भर देत असून, दरवर्षी 5 हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली जाणार आहे. यामुळे आधुनिक शेती तंत्रज्ञान, सिंचन सुविधा, बी-बियाण्यांची उपलब्धता यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा अपेक्षित आहे.
3) प्रत्येक शेतकऱ्याच्या दारी रस्ता
शेतीशी निगडीत वाहतूक आणि दळणवळण सुधारण्यासाठी पुढील 5 वर्षात 100 टक्के पांदण रस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी बावनकुळे समितीचा अहवाल लवकरच सादर होणार असून, त्या आधारे उच्च दर्जाचे रस्ते तयार करण्यात येणार आहे.
4) गावागावात सिमेंट काँक्रीट रस्ते,18 हजार कोटींची तरतूद
1000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावात सिमेंट काँक्रीट रस्ते तयार करण्यात येणार आहेत. यासाठी 18,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी फडणवीस यांनी दिल्लीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली असून, केंद्र सरकारची मान्यता मिळताच काम सुरु करण्यात येणार आहे.
5) घरकुल योजनेचा विस्तार
2016 ते 2022 दरम्यान प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 17 लाख घरं बांधली गेली होती. मात्र सर्वेक्षणानुसार राज्यात एकूण 30 लाख घरांची गरज आहे. केंद्र सरकारने एकाच वर्षात ही गरज मान्य केली असून, लवकरच सर्व पात्र कुटुंबांना घर मिळणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
6) सौर ऊर्जेद्वारे शेतकऱ्यांची वीजबिल शून्यावर
30 लाख घरांवर सोलर पॅनेल लावण्यात येणार असून त्यामुळे घरगुती वीजबिल शून्य होईल. याशिवाय, मुख्यमंत्री कृषी सौर ऊर्जा योजना डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण केली जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज उपलब्ध होईल आणि रात्री शेतात जाण्याची गरज भासणार नाही असे फडणवीस म्हणाले
7) शाश्वत विकासासाठी ठोस पावले
बैठकीत घेतलेल्या या निणर्यामुळे केवळ विदर्भ नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाला चालना मिळणार आहे. योजनांची अंमलबजावणी सुरळीत झाली, तर विदर्भातील दुष्काळ, बेरोजगारी आणि स्थलांतर हे प्रश्न इतिहासजमा होतील असा विश्वासदेखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.