
खडसे यांचा गंभीर आरोप; सखोल चौकशीची केली मागणी…
पुणे: पुण्यातील गाजलेल्या ड्रग पार्टी प्रकरणावरून आज (दि.२९) एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत पोलिसांच्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
खडसे यांनी थेट विचारले की, “रेव्ह पार्टीची व्याख्या काय? पोलिसांनी रेव्ह पार्टी म्हणून बदनामी का केली?” तसेच, पोलिसांनी कारवाईचे व्हिज्युअल्स माध्यमांसमोर दाखवून, महिला आणि पुरुषांचे चेहरे उघडपणे दाखवल्याने बदनामीचे सूत्र जाणीवपूर्वक ठेवले, असा आरोप त्यांनी केला. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत आज बोलत होते.
खेवलकर यांच्या हातात ड्रग्स नव्हते; खडसे
जावई प्रांजल खेवलकर यांचे नाव या प्रकरणात आल्यावरून खडसे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “खेवलकर यांच्या हातात ड्रग्स नव्हते, हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते. ज्याच्याकडे अमली पदार्थ सापडले, त्याला पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला हवे होते. खेवलकर यांच्यावर एकही गुन्हा नाही, तरी त्यांना पहिल्या क्रमांकाचा आरोपी का केले?” असा सवाल त्यांनी केला.
हे सर्व कोणाच्या सांगण्यावरून?, सखोल चौकशी व्हावी
खडसे यांनी पुढे सांगितले, “पोलिसांनी जाणीवपूर्वक आमच्या कुटुंबाचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या जावयाचा मोबाइल आणि लॅपटॉप जप्त करून त्यातील खासगी फोटो व्हायरल करण्यात आले. हे सर्व कोणाच्या सांगण्यावरून केले जात आहे, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मी मागणी करतो.
पोलिसांनी VISUAL माध्यमांना का दिले?
एकनाथ खडसे यांनी पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “पोलिसांनी व्हिज्युअल (VISUAL) माध्यमांना का दिले? मेडिकल रिपोर्ट पोलिसांकडे कसा पोहोचला आणि तो मीडिया पर्यंत कसा गेला? रिपोर्टमध्ये छेडछाड होईल, अशी भीती वाटते. पोलिस टेंपरिंग करत आहेत का?” असा संशयही त्यांनी व्यक्त केला.
गुगल ड्राईव्हवरील माहिती भाजप आमदाराकडे कशी?
खडसे यांनी सांगितले की, “ससून रुग्णालयात पत्र देऊन वैद्यकीय चाचणीचे CCTV मिळावे, अशी मागणी केली आहे. पोलिसांकडून व्हिज्युअल मागवणार आहे. गुगल ड्राईव्हवरील माहिती भाजप आमदाराकडे कशी पोहोचली, हेही तपासावे लागेल.
प्रकरणात सखोल चौकशी व्हावी, पोलिसांची भूमिका पारदर्शक असावी- एकनाथ खडसेंची मागणी
हे सत्ताधाऱ्यांचे षड्यंत्र आहे, सर्वकाही नियोजनबद्धपणे केले जात आहे. आम्ही दबून जाणार नाही, लढणार, असा निर्धार खडसे यांनी व्यक्त केला. तसेच, गिरीश महाजन यांचे नाव घेतो म्हणून हे सर्व सुरू आहे,” असा आरोपही त्यांनी केला. प्रकरणात सखोल चौकशी व्हावी, पोलिसांची भूमिका पारदर्शक असावी, अशी मागणी करत खडसे यांनी पोलिसांविरोधात बदनामीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. पुण्यातील या गाजलेल्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपास आणि चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.