
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात आपला फणा काढण्यास सुरुवात केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानकपणे भारतीय वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ लादला.
यामुळे अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि शेअर बाजारामध्ये मोठा बदल दिसून येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी देखील ट्रम्प यांनी भारताला आव्हान दिले आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत वादग्रस्त विधान करत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले रंग दाखवून दिले आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत विधान केले आहे. रशियाकडून तेल खरेदी करत असल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली होती. बुधवारीच त्यांनी ब्रिक्स गटात भारताच्या उपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली होती आणि शुल्क लादण्यामागे हेच कारण असल्याचेही सांगितले होते. त्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता भारताच्या अर्थव्यवस्थेला मृत म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिले की, भारत रशियासोबत काय करतो याने मला काही फरक पडत नाही. ते म्हणाले की माझा अर्थ एवढाच आहे की ते त्यांच्या मृत अर्थव्यवस्थांना कसे खाली आणण्यासाठी एकत्र काम करू शकतात, अशी वादग्रस्त टिप्पणी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबाबत केली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून भारत आणि रशियामधील खोल मैत्रीबद्दलची त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून येते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पुढे म्हणाले की, आम्ही भारतासोबत खूप कमी व्यापार केला आहे. त्यांचे दर खूप जास्त आहेत, जगात सर्वाधिक आहे. त्याचप्रमाणे, रशिया आणि अमेरिका देखील कधीही कोणताही व्यापार करत नाहीत. चला ते तसेच राहू द्या, अशा शब्दांत डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीयांचा दुखावला स्वाभिमान
भारताची अर्थव्यवस्था ही आता जपानला मागे टाकून पुढे गेली आहे. भारत हा सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र भारताच्या अर्थव्यवस्थेला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मृत म्हटल्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ट्रम्प यांच्या भारताविरुद्ध २५ टक्के कर लादण्याच्या घोषणेनंतर चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर रशियासोबत असलेल्या संबंधांमुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत वादग्रस्त टिप्पणी केली आहे.
रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांवर हल्ला
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये व्लादिमीर पुतिन यांचे जवळचे सहकारी आणि रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांच्यावर आणखी हल्लाबोल केला. ट्रम्पने रशियाचे अपयशी माजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदेव, जे अजूनही स्वतःला राष्ट्रपती मानतात, त्यांना त्यांच्या शब्दांवर लक्ष ठेवण्याचा इशारा दिला. ते अतिशय धोकादायक क्षेत्रात प्रवेश करत आहेत, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.