
दैनिक चालु वार्ता पालघर प्रतिनीधी -रवि राठोड
पालघर : आर्यन हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक सजगतेसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला. ‘बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (POCSO Act)’ तसेच ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या राष्ट्रीय मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हा न्यायालयातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना सखोल व प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात पालघर जिल्हा न्यायालयाच्या मा. न्यायाधीश अंजली चौधरी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ‘चांगला आणि वाईट स्पर्श’ यातील मूलभूत फरक, त्याची ओळख कशी पटवावी, आणि अशा प्रसंगी घ्यावयाची दक्षता याबाबत अत्यंत समर्पक माहिती दिली. लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार अनेकदा गुपितात राहतात, याचे कारण म्हणजे योग्य माहितीचा अभाव आणि भीती. त्यामुळे शाळा, पालक आणि समाज यांनी एकत्र येऊन मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
न्यायाधीश चौधरी यांनी पालकांची भूमिका देखील अधोरेखित करत सांगितले की, “पालकांनी मुलांच्या वागणुकीकडे संवेदनशीलपणे लक्ष द्यावे. संवादाच्या माध्यमातून विश्वासाचे नाते तयार करावे. बालकांची व मानसिक तसेच शारीरिक सुरक्षितता ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.”
या कार्यक्रमात अधिवक्ता संयुक्ता तामोरे यांनी स्त्री शिक्षणाचे सामाजिक व वैयक्तिक फायदे विषद करताना सांगितले की, “स्त्री शिक्षण हे केवळ उज्ज्वल भविष्याचे दार उघडणारे साधन नाही, तर समाजाच्या प्रगतीसाठीही आवश्यक आहे. शिकलेली स्त्री केवळ स्वतःचा विकास करत नाही, तर ती संपूर्ण पिढी घडवते.” त्यांनी मुलींना शिक्षणाच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात अधिवक्त्या तेजल ठाकूर, सुप्रिया सावे तसेच सामाजिक कार्यकर्त्या प्रियंका चौधरी व विनोद राठोड यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्त्री सशक्तीकरण, शिक्षण, आणि सामाजिक जबाबदाऱ्या यावर आपले विचार मांडले. त्यांनी अनेक उदाहरणे देत मुलींना स्वप्ने बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी चिकाटीने लढा, असा संदेश दिला.
कार्यक्रमाचे आयोजन आणि समन्वय उपमुख्याध्यापिका माधवी लाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच अनेक पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयीची जाण, आत्मभान, आत्मसंरक्षण आणि शिक्षणाची गरज यांचा बोध निर्माण करणारा ठरला. समाजात वाढत असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तींच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत गरजेचे आहेत, हेही या निमित्ताने अधोरेखित झाले.