
फडणवीसांचं जनसुरक्षा कायद्यावरुन राज ठाकरेंच्या आव्हानाला उत्तर…
राज्य सरकारनं आणलेल्या जनसुरक्षा कायद्याला विरोधकांनी विरोध केला आहे. त्यातच आता राज ठाकरेंनी देखील या कायद्याविरोधात भूमिका घेतली आहे. शेतकरी-कामगार पक्ष अर्थात शेकापच्या व्यासपीठावर बोलत असताना त्यांनी आपली भूमिका मांडली.
विशेष म्हणजे तुम्ही या कायद्यांतर्गत आंदोलकांना अटक करुन दाखवाच, अशा शब्दांत राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं आहे. त्यांच्या या आव्हानाला मुख्यमंत्र्यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
शेकापचा वर्धापनदिनाचा मेळावा आज पनवेलमध्ये पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रमुख वक्ते आणि पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत देखील यावेळी उपस्थित होते. “राज्य सरकारनं एक कायदा आणला त्यानुसार तुम्ही कोण आहात तर अर्बन नक्षल आहात! तुम्ही कुठल्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करु शकतं, एकदा करुच देत!” अशा शब्दांत राज ठाकरेंनी यावेळी सरकारला थेट आव्हान दिलं.
राज ठाकरे पुढे म्हणाले, “या महाराष्ट्रात मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहणार नाहीत. जर तुम्हाला उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा सन्मान राखूनच तुम्हाला उद्योग आणावे लागतील नाहीतर तुम्हाला आणता येणार नाहीत. संपूर्ण राज्यात कोणत्या प्रकारची प्रगती होते, कुठून कुठले रस्ते होणार हे फक्त मंत्र्यांनाच माहिती. पण का? तेच ठरवणार आणि रस्ता व्हायच्या आधी तेच जमिनी घेणार आणि मग या सगळ्या उद्योगपतींशी व्यवहार करणार मग सगळे गब्बर होणार. मग निवडणुकीच्या तोंडावर विषय गेला बाजुला, विचार गेला बाजुला फक्त तुमच्या तोंडावर पैसे फेकून मारणार, आणि तुमचे मतं घेणार. एवढाच उद्योग महाराष्ट्रात सुरु आहे. कोणीही याचा खोलात जाऊन विचार करायला तयार नाही.
राज ठाकरेंच्या आव्हानाला मुख्यमंत्र्यांचं उत्तर
दरम्यान, राज ठाकरेंनी कारवाई करुन दाखवाच अशा दिलेल्या आव्हानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आव्हान दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, “त्यांच्याकरता हा कायदा बनलेलाच नाही कायदा, तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागाल तर अटक होईल. तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागत नाही त्यामुळं तुम्हाला अटक करण्याचं कारण नाही. मला वाटतं अशा पद्धतीचे कायदे जे बनतात ते कायद्याच्याविरोधात वागतात त्यांच्यासाठी आहेत. आंदोलकांच्याविरोधात हा कायदा नाही, सरकारच्या विरोधात बोलायला यात पूर्ण मुभा आहे, त्यांच्याविरुद्ध हा कायदा नाही. त्यामुळं मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या कमेंट्स या कायदा न वाचता केलेल्या कमेंट आहेत.