
निशिकांत दुबे पुन्हा बरळले !
भाजपचे खासदार निशिकांत दुबे हिंदी-मराठी भाषेच्या वादादरम्यान सातत्याने वादग्रस्त विधान करत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मराठी माणसाच्या विरुद्ध बोलत आपटून-आपटून मारू असे विधान केले होते.
यानंतर आता दुबेंनी मुंबईत केवळ 30% मराठी आहेत, असं म्हणत राज आणि उद्धव ठाकरेंचं राजकारण संपणार असल्याचं विधान केले आहे. तसेच ठाकरेंच्या राजकारणाच्या कॉफिनला अखेरचा खिळा बसणार, असा दावाही दुबेंनी केला आहे.
दुबेंच्या या विधानाचा संजय राऊतांनी चांगलाच समाचार घेतला आहे. “असे किती दुबे आले आणि गेले, मराठी माणसाच्या विरुद्ध बोलतायत आणि त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे समर्थन करत आहे. दिल्लीतील लोकांनी या प्रवृत्तीला खतपाणी घालू नये. हा विषय महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या अस्मितेचा विषय आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. याशिवाय मुंबईत आल्यावर दुबेंचं मनसे स्टाईल स्वागत करू, असा इशाराही मनसेच्या संदीप देशपाडेंनी दिला.
निशिकांत दुबे काय म्हणाले ?
एका मुलाखतीत निशिकांत दुबे म्हणाले की, मुंबई बनवण्यात उत्तर प्रदेश, बिहार आणि हिंदी भाषिकांचे मोठे योगदान आहे. आजही जी अर्थव्यवस्था आहे त्यात आम्हीही योगदान देत आहोत. केवळ आम्हीच करतोय असं मी बोलत नाही परंतु आम्हीही करतोय. तुम्ही कोणत्या आधारे बोलता, केवळ ३० टक्के लोक मुंबईत मराठी बोलतात. १२ टक्के लोक उर्दू बोलतात म्हणजे ते मुस्लीम आहे. जवळपास ३० टक्केच हिंदी भाषिक आहेत. २ ते अडीच टक्के राजस्थानी बोलतात, कुणी गुजराती बोलतात, भोजपुरी बोलतात. त्यामुळे भाषेच्या आधारे त्यांचा हेतू साध्य होणार नाही.”
“निवडणुकीसाठी भाषेचे राजकारण केले जाते मात्र यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीनंतर मनसे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण पूर्णत: मुंबईतून संपून जाईल. कारण पैसे कमवण्याचं साधन बंद झाले, सर्वांनी यांच्याविरोधात मते दिली तर ते यापुढचं असं राजकारण करण्याची त्यांना संधी मिळणार नाही,” असं त्यांनी म्हटलं. दरम्यान, या विधानानंतर पुन्हा एकदा निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबईत विविध भाषिकांची टक्केवारी –
मराठी – 40 टक्के
गुजराती – 20 टक्के
उत्तर भारतीय – 16 टक्के
मुस्लीम – 15 टक्के
दक्षिण भारतीय- 6 टक्के
इतर भाषिक- 3 टक्के