
सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी सोमवारी काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना चांगलेच फटकारले होते.
चीनने भारताचा भूभाग बळकावल्याच्या विधानावर कोर्टाने नाराजी व्यक्त करत खरे भारतीय असे बोलणार नाहीत, असे निरीक्षण कोर्टाने नोंदविले होते. त्यावर आता तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
काँग्रेसच्या नेत्या व राहुल गांधी यांच्या भगिनी खासदार प्रियांका गांधी याही चांगल्याच संतापल्याचे दिसले. मीडियाशी बोलताना त्यांनी थेट कोर्ट आणि न्यायाधीशांवरच बोट ठेवले. त्या म्हणाल्या, कोण खरा भारतीय आहे आणि कोण नाही, हे ठरविणे न्यायव्यवस्था किंवा कोणत्याही न्यायाधीशांचे काम नाही. न्यायव्यवस्थेचा पूर्ण सन्मान ठेवून मी हे विधान करत असल्याचेही त्या म्हणाल्या.
राहुल गांधी यांनी नेहमीच भारतीय सैन्यदल आणि आपल्या जवानांचा सन्मान केला आहे. सैन्यदलाविषयी त्यांना आदर आहे. विरोधी पक्षनेने म्हणून सरकारला प्रश्न विचारणे त्यांची जबाबदारी आहे. पण जेव्हा सरकार उत्तर देत नाही, तेव्हा सरकार असे पर्याय शोधते, अशी टीकाही प्रियांका गांधींनी मोदी सरकारवर केली.
इंडिया आघाडीच्या बैठकीतही न्यायमूर्तींच्या विधानावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या बैठकीला राहुल यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व आघाडीतील इतर पक्षांचे नेते उपस्थित होते. आघाडीतील सर्व घटक पक्षांनी न्यायाधीशांनी केलेली टिप्पणी ही राजकीय पक्षांच्या लोकशाहीने दिलेल्या अधिकाऱ्यांच्या विरुध्द असल्याचे मत मांडल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली.
राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर टिप्पणी करणे राजकीय पक्ष आणि विशेषत: विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी आहे. जेव्हा एखादे सरकार आपल्या सीमांचे रक्षण करण्यात असफल ठरते, तेव्हा त्यांच्यावर जबाबदारी टाकण्याचे प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे.
काय घडलं कोर्टात?
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल यांनी चीनने भारताच्या दोन हजार चौरस किलोमीटर जमिनीवर कब्जा केल्याचे विधान केले होते. त्याविरोधात उत्तर प्रदेशात त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आले आहे. या खटल्याविरोधात राहुल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी झाली.
सुनावणीदरम्यान कोर्टाने राहुल यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करताना म्हटले होते की, चीनने दोन हजार चौरस किलोमीटर जमिनीवर कब्जा केल्याचे तुम्हाला कसे माहिती? तुम्ही तिथे होता का? तुमच्याकडे काही विश्वासार्ह पुरावे आहेत का? तुम्ही तुम्ही असे विधान का करता? खरे भारतीय असे बोलणार नाहीत.