
भेटीदरम्यान केली मोठी मागणी…
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. बच्चू कडू हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले होते. या भेटीवेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर मुद्द्यांवरुन चर्चा केली.
यावेळी बच्चू कडू यांनी राज ठाकरेंना यवतमाळमध्ये होणाऱ्या यात्रेला येण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी आम्ही अनेकदा मुंबई बंद होताना पाहिली आता ती एक दिवस शेतकऱ्यासाठी बंद राहायला हवी, अशी मागणी बच्चू कडूंनी राज ठाकरेंकडे केली.
सरकारकडून टिंगलबाजी
बच्चू कडूंनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बच्चू कडूंनी विविध विषयांवर भाष्य केले. शेतकऱ्यांचा विषय हाच एक संवाद होता. त्यासंदर्भात कशाप्रकारे पुढे गेलं पाहिजे. पुढचे आंदोलन कसे, कधी आणि केव्हा करणं व्यवस्थित होईल. या सर्वांवर चर्चा झाली. आमचा हेतू हाच आहे की हे आंदोलन बच्चू कडूंच्या नावापुरती न राहता ते शेतकरी म्हणून कसं पुढे जाईल. मी मोठं होणं हा महत्त्वाचा विषय नाही. सध्या शेतकरी जो संकटात सापडलेला आहे आणि सरकार त्याची जी काही टिंगलबाजी करत आहे. ते फार चुकीचं आहे, असे बच्चू कडू म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणतात की दुष्काळ पडला तर मग आपण कर्जमाफीचा विचार करु. त्यामुळे आता दुष्काळ पडायची वाटच पाहिली जात आहे का, असा प्रश्न आता पडला आहे. हा संपूर्ण प्रकार शेतकऱ्यांसाठी दुर्दैवी आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून शेतमालाला भाव दिला जात नाही, हे त्यापेक्षा जास्त नुकसानकारक आहे. मागील दोन वर्षांपासून भाव दिला जात नाही, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे फडणवीसांच्या लक्षात आलं पाहिजे, असेही बच्चू कडूंनी म्हटले.
मुंबई बंद करण्याचे आवाहन
त्यामुळे मी राज ठाकरेंना आता यवतमाळमध्ये जी यात्रा काढली जाणार आहे, त्याचे आमंत्रण दिले. तिथे त्यांनी यावं. शेतकऱ्यांना संबोधित करावं. तसेच आमचं असं स्वप्न आहे की आम्ही अनेकदा मुंबई बंद होताना पाहिली आता ती एक दिवस शेतकऱ्यासाठी बंद राहायला हवी. तसेच किमान काही तास मुंबईने शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं. कारण ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि या देशाच्या राजधानीतूनच शेतकऱ्यांना दिलासा देणारा आवाज निर्माण व्हावा या अपेक्षा राज ठाकरेंकडून आहेत. शेतकरी हा विषय एका जातीचा, धर्माचा किंवा पक्षाचा नाही. त्यामुळे जर मनसे सोबत आलं तर निश्चितच बळ मिळेल. आमचा अजेंडा निवडणुकीचा नव्हे तर मरणारा शेतकरी वाचवणे हा आहे. हे आंदोलन राजकारणासाठी नाही, असेही बच्चू कडूंनी सांगितले.
यावेळी बच्चू कडूंना निवडणूक आयोगाच्या व्हीव्हीपॅटबद्दलच्या निर्णयाबद्दल विचारणा करण्यात आली. यावर त्यांनी टीका केली. निवडणूक करण्यापेक्षा भाजप कार्यालयातच ठपके मारा आणि निवडणुका घ्या. सामान्य कार्यकर्त्याला विचारलं तर तो देखील सांगेल की ईव्हीएम मशीन असेल तर तुम्ही निवडणुका का लढता, अशाप्रकारे भावना तयार होतात. मनसे आणि प्रहार एकत्र स्थानिक स्वराज्य निवडणूक लढणं हा आताचा काही विषय नाही. शेतकरी एकत्र येत नाही, हाच मूळ विषय आहे, असे बच्चू कडू म्हणाले.