
चिपळूण तालुक्यातील धामणवणे येथे झालेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने राज्यात खळबळ उडाली होती. रावतळे परिसरात राहणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा जोशी (वय 63) यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी विवस्त्र अवस्थेत पोलिसांना आढळून आला होता.
मृतदेहाचे हातपाय बांधलेले होते आणि शरीरावर जखमांचे अनेक व्रण देखील आढळून आले होते. पोलीस जेव्हा या प्रकरणाचा तपास करत होते. तेव्हा त्यांना घरातील CCTV कॅमेऱ्याची हार्ड डिस्क (डीव्हीआर) देखील गायब असल्याचं समजलं. यावरून मारेकऱ्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना होता.
पोलिसांनी आता या प्रकरणाचा उलगडा केला असून, वर्षा जोशी यांची हत्या का करण्यात आली? व कोणी हत्या केली? याबाबत धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी या घटनेतील आरोपीला पकडले असून, त्याचे नाव जयेश गोंधळेकर असे आहे. आरोपी हा त्याच परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांना तपासात या तरुणाने दागिने आणि पैशांसाठी खून केल्याची माहिती समोर आली.
जयेश गोंधळेकर हा काही वर्षांपूर्वी सातारा येथे नोकरी करत होता. तो मूळ जोशी यांच्या गोंधळे गावातीलच गोंधळेकर कुटुंबातील आहे. तो सध्या चिपळूण परिसरात राहत होता. मात्र, त्याच्याकडे नोकरी नसल्याने त्याने पैशांसाठीच हा खून केल्याचे समोर आले. आरोपी हा परिसरातीलच असावा असा पोलिसांना संशय होता. कारण कोणताही व्यक्ती दार तोडून नव्हे, तर आतून दार उघडल्यानंतर घरात घुसला होता. पोलिसांनी याच्या आधारे परिसरात आरोपीचा शोध सुरु केला. आणि त्याला बेड्या ठोकल्या.
निवृत्त शिक्षिकेच्या हत्येची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी समोर आली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला होता. पोलिसांनी या खूनाचा उलगडा एका आठवड्यातच केला असून, आरोपीला लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान, वर्षा जोशी या पतीच्या मृत्यूनंतर एकट्याच राहत होत्या. शिक्षिका म्हणून निवृत्त झालेल्या वर्षा या फिरून राहिलेल्या आयुष्याचा आनंद उपभोगण्याचा प्रयत्न होत्या. त्या काही दिवसात हैदराबादला फिरायला देखील जाणार होत्या. त्यांची मैत्रिण त्यांना फोन करण्याचा देखील प्रयत्न करत होती. मात्र, कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने मैत्रिणीने एका व्यक्तीला विचारपूस करण्यास वर्षा जिथे राहतात तिथे पाठवलं आणि हत्येचा उलगडा झाला.