
बुलढाण्याचे शिवसेना पक्षाचे आक्रमक आणि वादग्रस्त आमदार संजय गायकवाड बनियन- टॉवेलवरच मुंबईतील आमदार निवासातील कँटीन मॅनेजरला जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
आता याच गायकवाडांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबतच आक्षेपार्ह भाषा वापरल्याचं समोर येत आहे. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून गायकवाडांना कडवट टीका करण्यात आली होती. यानंतर आता आमदार संजय गायकवाडांनी (Sanjay Gaikwad) पलटी मारली आहे.
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या वक्तव्यावरुन यू-टर्न घेतला आहे. ते म्हणाले, माझ्या मतदारसंघात बॉक्सिंग मारताना प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. याबाबत मला विचारण्यात आल्यावर माझे प्रतिकात्मक आंदोलन करण्याची उबाठाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची औकात नसल्याचं म्हटलं होतं अशी सारवासारव केली आहे.
तसेच तुम्ही डायरेक्ट बाळासाहेबांचे नाव केले. माझ्या शब्दाचा विपर्यास करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे हे रक्ताने उद्धवसाहेबांचे वडील आहेत. पण बाळासाहेब हे सर्वांचे दैवत आहे व सर्वांचे बाप आहेत. आम्हांला बाळासाहेब ठाकरेंचीच शिकवण असून आपलं ते वक्तव्य उबाठाच्या कार्यकर्त्यांबाबत बोलल्याचा खुलासा आमदार संजय गायकवाडांनी केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांविरोधात सोमवारी राज्यभर जोरदार जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. यावेळी बुलडाण्यात एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधातही प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं.
या आंदोलनावरच आमदार संजय गायकवाड यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं जे आंदोलन करण्यात आलं, त्यांना काही काम राहिलेलं नाही. ते माझी कॉपी करू शकत नाहीत, कारण मी ओरिजनल असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
इतकंच काय तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही. विरोधी पक्षानं लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठवायला पाहिजे,पण ते नको त्या गोष्टीवर आंदोलन करत असल्याचा खोचक टोलाही गायकवाडांनी लगावला.
गायकवाड म्हणाले, राज्यात फक्त 20 जागा देऊन जनेतेनं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला त्यांची जागा दाखवली असल्याची टीकाही गायकवाडांनी केली. तसेच जे कधी मातोश्रीमधून बाहेर पडत नव्हते, ते आता बाहेर रस्त्यावर पडले आहेत. त्यामुळे आतातरी त्यांनी सुधारावं. कारण आम्ही आता महायुतीमध्ये असल्याचंही शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी म्हटलं.