
मुंबईतील कबुतरखाना वाद पेटला राज ठाकरे संतापले; म्हणाले जैन मुनी…
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कबुतरखान्याचा वाद सुरु आहे. दादर कबुतरखान्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष रीट पिटीशन सर्वोच्च न्यायालयाद्वारे फेटाळण्यात आली. कबुतरखान्यासंबंधी जो काही निर्णय व्हायचा असेल तो मुंबई उच्च न्यायालयामध्ये होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.
कबुतरखान्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. याबद्दलची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने हे कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
राज ठाकरे यांनी नुकतंच मुंबईतील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना कबुतरखान्याच्या बंदीचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केले. मुंबई हायकोर्टाने सांगितल्यावरही जर कबुतरांना खायला घालत असतील तर त्यावर पोलिसांनी कारवाई करणं गरजेचे आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
जैन मुनींनी विचार करणे गरजेचे
वरळीतील लोक स्वतच्या घरात जातात ही खूप चांगली गोष्ट आहे. स्वतच्या मोठ्या घरात तेही मुंबईत जाणं ही फार चांगली गोष्ट आहे. कबुतरखान्याबद्दल दोन विषय आहेत. एक म्हणजे हायकोर्टाचा निर्णय आहे. त्यामुळे त्याप्रमाणे सर्वांना वागावं लागेल. त्याप्रमाणे जैन मुनींनी हा विचार करणं गरजेचे आहे. हायकोर्टाने जर कोणत्याही गोष्टीवर बंदी घातली आहे, तर त्याप्रकारे ते करायला हवं, असं मला वाटतं, असे राज ठाकरे म्हणाले.
हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट कशाला म्हणायचे?
दुसरं म्हणजे कबुतरांमुळे कोणकोणत्या प्रकारचे रोग होऊ शकतात, हे आतापर्यंत अनेक डॉक्टरांनी सांगितलेले आहे. त्यांना खायला घालू नये असं हायकोर्टाने सांगितल्यावरही जर त्यांना खायला घालत असतील तर त्यावर पोलिसांनी कारवाई करणं गरजेचे आहे. हायकोर्टाचा निर्णय जर त्यांना खायला घालू नका असा आहे, तर मग धर्म धर्म या नावाखाली जर तुम्ही त्यांना खायला घालत असाल तर मग ते अत्यंत चुकीचं आहे. कारण जर या गोष्टी एकदा सुरु झाल्या तर लगेचच बाकीच्या गोष्टी सुरु होतात. मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट कशाला म्हणायचे? असा सवाल राज ठाकरेंनी केला.
कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे
यासाठी जैन लोकांकडूनही आंदोलन झाले. तसेच मराठी लोकांकडूनही आंदोलन झाले. ज्यावेळी त्यांच्याकडून आंदोलन झालं तेव्हा पोलिसांनी कारवाई करायला हवी होती. ती झाली नाही. यात जे लोढा वैगरेसारखे जे माणसं मध्ये येतात. ते मंत्री आहेत, कोणत्याही समाजाचे मंत्री नाही. त्यांनी महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे. त्यांनी जे काही चाकू सुऱ्या आणल्या असतील, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करायला हवी. काल जे काही मराठी लोक गेली होती. त्यांना धक्काबुक्की झाली. पत्रकारालाही मारहाण झाली, हा नक्की काय प्रकार सुरु आहे, मला काहीही समजत नाही. सरकारला नक्की हवंय काय, फक्त निवडणुकीसाठी सर्व समाजांमध्ये त्यांनी एक एक विषय सुरु केलेत. आधी हिंदी आणून पाहिलं, आता कबुतर आणली आहेत, असेही राज ठाकरे म्हणाले.