
अश्लील फोटोंनी सुरु झाले…
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण समाजाला हादरवून सोडलं आहे. एका मानव तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश करताना पोलिसांनी बांगलादेशातील 14 वर्षीय मुलीला देह व्यापाराच्या जाळ्यातून मुक्त केलं आहे.
या अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितलेल्या भयावह अनुभवाने सर्वांनाच सुन्न केलं आहे. तिने सांगितलं की, अवघ्या तीन महिन्यांत 200 हून अधिक व्यक्तींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणाचा तपास आणि त्यामागील भयंकर सत्य जाणून घ्या…
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी एका देह व्यापार रॅकेटचा भांडाफोड करत बांगलादेशातील 14 वर्षीय मुलीला मुक्त केलं आहे. या अल्पवयीन मुलीने एका स्वयंसेवी संस्थेला दिलेल्या निवेदनात सांगितलं की, केवळ तीन महिन्यांत 200 हून अधिक पुरुषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही मुलगी बांगलादेशातील रहिवासी असून, वयाच्या 12 व्या वर्षी ती रुबी बेगम आणि मोहम्मद खालिद बापारी यांच्या संपर्कात आली. शाळेत एका विषयात नापास झाल्यामुळे तिला आपल्या पालकांकडून मार खाण्याची भीती वाटत होती. या भीतीचा गैरफायदा घेत रुबी बेगमने आपला पती मोहम्मद खालिद अब्दुल बापारी याच्या मदतीने तिला बेकायदेशीरपणे बांगलादेशातून भारतात कोलकात्याला आणलं.
अश्लील फोटोंमुळे झाली सुरुवात
कोलकात्यात तिच्यासाठी बनावट निवास दस्तऐवज तयार करण्यात आले. त्यानंतर तिला विमानाने गुजरातमधील नाडियाड येथे नेण्यात आलं. तिथे एका वृद्ध व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केले आणि तिचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. यानंतर तिला देह व्यापाराच्या दलदलीत ढकलण्यात आलं. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अटक केलेल्या व्यक्तींपैकी सहा जण आणि 14 वर्षीय मुलींसह एकूण पाच पीडितांपैकी तीन जण बांगलादेशी नागरिक आहेत. अटक केलेल्यांमध्ये 33 आणि 32 वर्षीय दोन महिलांचाही समावेश आहे, ज्यांनी कथितरित्या या नाबालिग मुलीला बांगलादेशातून भारतात आणण्यास मदत केली. नायगांव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय कदम यांनी सांगितलं की, आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे.
200 जणांनी केला लैंगिक अत्याचार
हार्मनी फाउंडेशनचे अध्यक्ष अब्राहम मथाई यांनी मागणी केली की, ज्या 200 हून अधिक व्यक्तींनी या मुलीवर लैंगिक अत्याचार केले, त्यांची ओळख पटवून त्यांना अटक करावी. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीला वयापेक्षा मोठं दिसावं यासाठी हार्मोनल इंजेक्शन्स देण्यात आली होती. मानवाधिकार कार्यकर्त्या मधु शंकर यांनी सांगितलं की, देशाच्या विविध भागांत अशा घटना समोर आल्या आहेत, जिथे अल्पवयीन मुलींचं अपहरण करून त्यांना देह व्यापार रॅकेटमध्ये ढकलण्यासाठी अशा इंजेक्शन्सचा वापर केला जातो.
पोलिसांनी नमूद केलं की, अटक केलेल्यांमध्ये मुख्य आरोपी मोहम्मद खालिद अब्दुल बापारी (33) याचा समावेश आहे, जो पीडित मुलींना देह व्यापारासाठी विविध शहरांत पाठवत होता. याशिवाय, एजंट जुबेर हारुन शेख (38) आणि शमीम गफ्फार सरदार (39) यांनाही अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या मुलीला गुंगीचे औषधं देण्यात आले आणि देह व्यापारात ढकलण्यासाठी तिला गरम चमच्याने दागही देण्यात आले.
सध्या, पीडित मुलीला उल्हासनगर येथील बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आलं आहे. नायगांव पोलिसांच्या विविध पथकं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील भागांत तपास करत असून, या रॅकेटमधील दलालांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी अद्याप कॅमेऱ्यासमोर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु त्यांनी सांगितलं की, तपास वेगाने सुरू आहे. स्वयंसेवी संस्थांनी मागणी केली आहे की, या प्रकरणातील सर्व दोषींना अटक करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी.