
माझ्या नादाला लागू नका !
रोहित तू लई चुरू चुरू बोलायला लागलायस… तुझी गाडी फारच सुसाट निघाली आहे… माझे भावकीकडे लक्ष आहे म्हणूनच तर तू आमदार झालास. माझ्या पक्षात मी काय करायचे ते मी बघतो.
तुम्ही तुमचे बघा. माझ्या कोणी नादी लागू नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. रोहित पवार यांना येथील कार्यक्रमात दिला. तुम्ही तुमच्या पक्षाचे काम करा, मी माझ्या पक्षाचे काम करतोय, असेही ते आमदार जयंत पाटील व रोहित पवार यांना उद्देशून म्हणाले.
येथील डॉ. प्रा. एन. डी. पाटील विधी महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील, आमदार रोहित पवार, माजी खासदार रामशेठ ठाकूर, सरोज पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रमात आ. रोहित पवार यांनी आपल्या भाषणात एन. डी. पाटील सभागृहास 40 लाख रुपयांचा निधी जाहीर केला. ते म्हणाले माझ्यापेक्षा ज्येष्ठ असणार्यांनी यावर एक-एक शून्य वाढवावा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून ते म्हणाले, दादा, तुम्ही गावकीचा विचार करता, तसा भावकीचा पण जरा करत जावा. निधीबाबत समानता ठेवून जरा आमच्यावरही लक्ष द्या.
आमदार रोहित पवार यांच्या या भाषणाचा धागा पकडत अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले, रोहित तू लई चुरू चुरू बोलायला लागलायस. तुझी गाडी फारच सुसाट निघाली आहे. माझे भावकीकडे लक्ष आहे म्हणूनच तर तू आमदार झालास. जयंतराव, विचारा त्याला, तो पोस्टल मतावर निवडून आला आहे. मी माझ्या पक्षाचे काम करतोय, जयंत पाटील त्यांच्या पक्षाचे काम करतात. पण मी माझ्या पक्षात काय करायचे, याबाबत आता दुसरेच सल्ले देत आहेत. माझ्या पक्षात कोणी काय करायचे, ते मी बघतो. तुम्ही तुमचे बघा. तुम्ही तुमचे काम करा, मी माझे काम करतो. माझ्या कोणी नादाला लागू नका. मी महायुतीत आल्यापासून तुमच्या कोणावर कधी मी टीका-टिपणी केली आहे काय? तुम्ही तुमच्या विचाराने चाला, मी माझ्या विचाराने चाललोय. शेवटी आपल्या सर्वांना महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साध्य करायचा आहे. मी शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांशी तडजोड केलेली नाही.
तीन टर्म आम्ही ज्युनिअरच होतो…
कार्यक्रमात अजित पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, 1990 साली मी, जयंतराव, आर. आर. पाटील व दिलीप वळसे-पाटील पहिल्या टर्मचे आमदार होतो. 1995, 1999 पर्यंत आम्ही जुनिअरच होतो. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत आम्हाला काहीच स्थान नव्हते. त्यामुळे काहीवेळा थिएटरमध्ये जाऊन आम्ही सिनेमाही पाहायचो. 2004 पासून कुठे आम्हाला विचारायला सुरुवात झाली. तीन टर्म आम्ही ज्युनिअरच होतो. मात्र आता काहींना पहिल्या टर्मपासूनच जबाबदारी हवी असते. त्यांना ज्येष्ठ झाल्यासारखे वाटते. मोठमोठी भाषणे करू लागतात, असा टोला त्यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता लगावला.
आर. आर.नी ऐकले नाही…
आर. आर. पाटील यांची आठवण सांगताना अजित पवार म्हणाले, शेवटी शेवटी आर. आर मला म्हणायचे, ‘दादा, तुमचे ऐकले असते तर मी तुमच्यात राहिलो असतो.’ मी त्यांना अनेकवेळा सांगितले होते, व्यसन करू नका. पण त्यांनी ऐकले नाही. काहींनी तर मी जाहीर कार्यक्रमात हा सल्ला दिला म्हणून माझ्यावर टीकाही केली. पण मी चांगल्यासाठीच सांगत असतो. मी फटकळ आहे. पण खरं तेच बोलत असतो. पण माझे कोण ऐकत नाही.
फुटीनंतर अजित पवार – जयंत पाटील पहिल्यांदाच एकत्र…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार जयंत पाटील पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले होते. त्यामुळे ते एकमेकांवर काय बोलतात, याकडेही सर्वांचे लक्ष होते.
आम्ही शरण जात नाही…जयंत पाटील यांचा टोला
आमदार जयंत पाटील म्हणाले, वाळवा तालुका हा स्वाभिमानी लोकांचा व क्रांतिकारकांचा तालुका आहे. येथील लोक सहजासहजी वाकत नाहीत, शरण जात नाहीत. फितुरी झाली तरी, जे जवळ राहतील त्यांना सोबत घेऊन लढायचे, ही शिकवण या मातीची आहे. त्यांच्या भाषणाचा रोख नेमका कोणाकडे होता हे उपस्थितांनाही कळून चुकले.
‘एन.डीं.’नी कधी सत्तेसाठी इकडून तिकडे उडी मारली नाही : जयंत पाटील
डॉ. एन. डी. पाटील यांनी राजकारणात आपल्या तत्त्वांशी आणि विचारांशी अखेरपर्यंत तडजोड केली नाही. सत्तेसाठी कधी इकडून तिकडे उडी मारली नाही, असा टोला आ. जयंत पाटील यांनी लगावला. त्यांच्या या वक्तव्यावर सभागृहात एकच हशा पिकला.