
तिरुपतीमधील श्री बालाजी मंदिरात भाविक दररोज लाखो रुपयांचे दान करतात. कुणी रोख रक्कम दान करतो, तर कुणी सोन्या-चांदिचे दागिने दान करतो. आता एका भाविकाने मंदिरात तब्बल १४० कोटी रुपयांचे १२१ किलो सोने दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी ही माहिती दिली. हा भाविक आपल्या व्यवसायातील यशाबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी हे दान करणार आहे. या भक्ताचे नाव आणि इतर माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे.
व्यवसायात मिळाले प्रचंड यश
मंगलागिरी येथील ‘गरिबी निर्मूलन’ कार्यक्रमात बोलताना नायडू म्हणाले की, या भाविकाने स्वतःची कंपनी सुरू करण्याचे स्वप्न पाहिले होते. भगवान वेंकटेश्वर स्वामींच्या कृपेने फक्त कंपनीच स्थापन झाली नाही, तर त्यांना मोठे यशही मिळाले. या भाविकाने आपल्या यशाचे श्रेय देवाला देण्याचे ठरवले. म्हणूनच, आता ते १२१ किलो सोने वेंकटेश्वर स्वामींना अर्पण करत आहेत.
बालाजीची सोन्याच्या दागिन्यांनी सजवली जाणार
नायडू पुढे म्हणाले की, या भक्ताने आपल्या कंपनीचे ६० टक्के शेअर्स विकून १.५ अब्ज अमेरिकन डॉलर्स कमावले आहेत. त्यामुळेच आता आपल्या संपत्तीचा काही भाग देवाला समर्पित करू इच्छितात. भगवान वेंकटेश्वर स्वामींची मूर्ती दररोज सुमारे १२० किलो सोन्याच्या दागिन्यांनी सजवली जाते. जेव्हा या भक्ताला हे कळले, तेव्हा त्यांनी १२१ किलो सोने दान करण्याचा निर्णय घेतला.
दरवर्षी लाखो भाविक तिरुपतीला भेट देतात
भगवान वेंकटेश्वर स्वामींचे मंदिर आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे आहे. हे जगातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत मंदिरांपैकी एक मानले जाते. हे मंदिर भगवान विष्णूचे अवतार वेंकटेश्वर यांना समर्पित आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मंदिर त्याच्या भव्यतेसाठी, आध्यात्मिक महत्त्वासाठी आणि देणगीच्या परंपरेसाठी ओळखले जाते. भाविक दरवर्षी या मंदिरात अब्जावधी रुपयांचे सोने, चांदी आणि रोख रक्कम अर्पण करतात.