
तर फलटणकर अन् 4 नेते तुरुंगात असते !
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातून विस्तवही जात नाही.या दोन्ही मुरब्बी नेत्यांकडून नेहमीच एकमेकांना आव्हानं देत कुरघोडी,टीकाटिप्पणीचं राजकारण सुरू असतं.
मागच्या काही महिन्यांत दोघांमधील संघर्ष अत्यंत टोकाला पोचला होता. मात्र, या दोघांनीही आपआपल्या तलवारी म्यान केल्याचं दिसून आलं होतं. आता पुन्हा एकदा भाजप मंत्री जयकुमार गोरेंनी (Jaykumar Gore) नव्या वादाची वात पेटवली आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि भाजप नेते जयकुमार गोरे हे खंडाळा तालुक्यातील अहिरे येथे भूमिपूजन व नागरी सत्काराच्या कार्यक्रमात बोलत होते.यावेळी मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, ‘मला अडचणीत आणण्यासाठी कित्येकांनी प्रयत्न केले परंतु जनता माझ्यासोबत होती. त्यामुळे या गोष्टींचा विशेष फरक पडला नसल्याचा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
तसेच नुकतीच निवडणूक झाल्यानंतर मला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तरीही मी कोणाला त्रास दिला नाही. मी ठरवलं असतं तर फलटणकर आणि माझ्या तालुक्यातले किमान चार नेते तुरुंगात असते, असा दावा करुन त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा तापवलं आहे.
यावेळी लोणंद कृषी उत्पन्न समितीचे संचालक बाळकृष्ण रासकर,सुखेडचे माजी उपसरपंच तात्यासाहेब पडळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला माजी आमदार मदन भोसले, धैर्यशील कदम, जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रिक,सहाय्यक निबंधक प्रीती काळे यांचीही उपस्थित होती.
सातारा जिल्ह्यातील रामराजे नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. दोघेही एकमेकांवर अत्यंत जहाल शब्दांत टीका करताना संपूर्ण सातारा जिल्ह्याने पाहिले आहे. मध्यंतरी जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात निंबाळकर यांना चौकशीसाठी नोटीस पाठविण्यात आली होती. रामराजेंच्या घरी जाऊन पोलिसांनी चौकशी केली होती. याच प्रकरणातील महिला आरोपीशी त्यांच्या संभाषणाचा ऑडिओ व्हायरल झाला होता.
याच प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याची चर्चा आहे. ह्या जयकुमार गोरेंनं आणि देवेंद्र फडणवीसांनी माफ केलं,नसतं तर जेलमध्येच असता लक्षात राहू दे,’असं गोरेंनी म्हटलं होतं. मात्र,रामराजेंची भूमिका काहींशी मवाळच होती.
तर रामराजे निंबाळकरांनी फलटण येथील एका कार्यक्रमात जयकुमार गोरे आणि माझं काही वैयक्तिक भांडण नसल्याचं स्पष्ट केलं होतं. पण गोरेंच्या मनात मीच सगळं करतो,असं आहे. त्यामुळे देव करो आणि त्यांना सदबुद्धी देवो. त्यांनी मंत्री व्हावं, गरिबांसाठी काम करावं. एवढंच माझं त्यांना सांगणं आहे. माझं वय वाढलेलं असून माझा तेवढं तर सांगण्याचा अधिकार असल्याचंही रामराजेंनी या कार्यक्रमात बोलून दाखवलं होतं.
एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याची चर्चा असतानाही मंत्री जयकुमार गोरेंनी पुन्हा एकदा नव्या राजकीय वादाची वात पेटवली. त्यांनी नुकतीच निवडणूक झाल्यानंतर मला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तरीही मी कोणाला त्रास दिला नाही. मी ठरवलं असतं तर फलटणकर आणि माझ्या तालुक्यातले किमान चार नेते तुरुंगात असते, असा दावा करुन त्यांनी फलटणच्या रामराजेंनाच अप्रत्यक्षपणे डिवचल्याचं दिसून येत आहे. तसेच त्यांनी सांगितलेले ते चार नेते कोण याचीही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झडू लागली आहे.