
तेल खरेदीवर भारताला मिळणार 5 टक्के डिस्काउंट; ट्रम्पलाही दिलं उत्तर…
भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिका चिडलेला आहेच. याच संतापाच्या भरात राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ आकारला.
या कराची अंमलबजावणी (Tariff War) येत्या 27 ऑगस्टपासून होणार आहे. या माध्यमातून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला आहे. मात्र या राजकारणातच भारताला दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. रशियाने मोठा (Russia) निर्णय घेत तेल खरेदीवर भारताला आणखी पाच टक्के डिस्काउंट देण्याची घोषणा केली आहे.
रशियाचे भारतातील उपव्यापार प्रतिनिधी एवगेन ग्रिवा यांनी सांगितले की भारताला कच्च्या तेलाच्या खरेदीवर पाच टक्के सूट मिळत राहील. चर्चेच्या आधारावर याबाबत निश्चिती होईल. राजकीय स्थिती व्यतिरिक्त भारत त्याच पद्धतीने रशियाकडून तेल आयात करत राहील. ही सूट कमर्शिअल सिक्रेट आहे. साधारणपणे याबाबतीत व्यापाऱ्यांत झालेल्या चर्चेच्या आधारावर निर्णय घेतला जातो आणि जवळपास पाच टक्क्यांच्या आसपास राहतो.
रशियाचे डिप्टी चीफ ऑफ मिशन रोमन बाबुशकिन यांनीही प्रतिक्रिया दिली. सध्याची परिस्थिती आव्हानात्मक आहे तरीही आम्हाला आमच्या संबंधांवर विश्वास आहे. बाहेरील दबावाचा विचार न करता भारत आणि रशिया ऊर्जा सहकार्य सुरूच राहील. बाहेरील दबावाचा उल्लेख करत त्यांनी अमेरिकेवर निशाणा साधला. त्यामुळे आगामी काळात दोन्ही देशांची वाटचाल कशी राहते यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.
भारतावर 50 टक्के टॅरिफ
ट्रम्प सरकारने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. यातील 25 टक्के टॅरिफ 7 ऑगस्टपासून लागू झाला आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील टॅरिफ 27 ऑगस्टपासून लागू होणार आहे. हा 25 टक्के टॅरिफ भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून लादण्यात आला आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करून युक्रेन युद्धाचे वित्तपोषण करत आहे असा आरोप अमेरिकेने केला आहे. व्हाइट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी सांगितले की भारत रशियाच्या तेलाचे जागतिक क्लिअरिंग हाऊस पद्धतीने काम करत आहे. प्रतिबंधित कच्च्या तेलाची जास्त दरात निर्यात करत आहे. या बदल्यात रशियाला डॉलर देत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना धमकी
डोनाल्ड ट्रम्प सुरुवातीपासूनच ब्रिक्स देशांना धमकावत आहेत. युक्रेन युद्ध समाप्त करण्यासाठी पावले उचलली गेली नाही तर आम्ही मॉस्कोवर निर्बंध टाकूच शिवाय रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवरही निर्बंध टाकू अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती. या धमकीचा सर्वाधिक फटका भारताला बसला आहे. चीन रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतो पण चीनच्या बाबतीत अमेरिकेने नरमाईचे धोरण घेतले आहे.