
आरोपांवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
सामाजिक न्यायविभागाचे मंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधात आमदार रोहित पवार यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. शिरसाट यांनी 5000 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळा केला आहे, असं रोहित पवारांनी म्हटलंय.
याचा आरोपांना घेऊन रोहित पवार यांनी नवी मुंबईच्या सिडको भवनावर मोर्चा केला. भिवलकर कुटुंब स्थानिक नसतानाही शिरसाट यांनी त्यांना जमीन कशी दिली? असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, रोहित पवार यांनी केलेल्या या गंभीर आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. असे आरोप रोजच होत असतात, पुरावे द्या, असं फडणवीसांनी म्हटलंय.
फडणवीस यांच्याकडून शिरसाट यांची पाठराखण
सिडकोचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर संजय शिरसाट यांनी भिवलकर कुटुंबीयांना हजारो कोटींची जमीन दिली, असा आरोप रोहित पवारांनी केलाय. त्यावर बोलताना रोहित पवार यांच्यासारखी मंडळी रोजच असे आरोप करत असतात. पण पुरावे दिले पाहिजेत. पुरावे नसताना असे आरोप करणे योग्य नाही. ही केस अजून मी पाहिलेली नाही. मात्र पुराव्यानिशी आरोप केले तर त्या आरोपांना तेवढेच परिणामकारक उत्तर दिले जाते. रोहित पवार यांच्याकडे काय पुरावे आहेत आणि रोहित पवारांनी काय आरोप केलेत हे मला माहिती नाही. पण विनापुराव्याचे आरोप केले जात आहेत, असे म्हणते फडणवीस यांनी संजय शिरसाट यांची पाठराखण केली.
रोहित पवार यांनी नेमका काय आरोप केला ?
शासनाची जमीन असूनही भिवलकर यांना ती जमीन साडे बारा टक्के दराने दिली गेली. यामागे सत्तेत असणारे लोक आहेत. सत्तेचा, पदाचा वापर करून भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाच हजार कोटी रुपयांची जमीन भिवलकर यांना देत असताना निवडणुकीच्या अगोदर काहीतरी व्यवहार झाला. शिरसाट आणि भिवलकर यांच्यात हा व्यवहार झाला होता. कदाचित शिरसाट यांच्या पक्षालाही निवडणुकीसाठी मोठा निधी दिला गेला होता, असा गंभीर आरोप रोहित पावर यांनी केलाय.
शिरसाट यांच्यासंदर्भात काही निर्णय होणार का?
दरम्यान, रोहित पवार यांनी शिरसाट यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याआधी छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनीही शिरसाट यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे आता शिरसाट यांच्यावर सातत्याने होत असलेले आरोप पाहता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही निर्णय घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.