
छगन भुजबळ यांनी केले अचुक विश्लेषण…
मुंबई महापालिकेच्या बेस्ट कर्मचारी सहकारी पतसंस्थेत ठाकरे बंधू एकत्र आले होते. मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यानंतर त्यांनी लढविलेली ही पहिली निवडणूक होती. निवडणुकीचा निकाल ठाकरे बंधूंसाठी धक्कादायक ठरला आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या निकालावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज आणि उद्धव ठाकरे बंधू एकत्र आल्याने बेस्ट सोसायटीच्या निवडणुकीला विशेष महत्त्व आणि ग्लॅमर प्राप्त झाले होते. त्यात कामगार नेते शशांक राव यांना १४ तर भाजप पुरस्कृत पॅनलला सात जागा मिळाल्या.
या संदर्भात मंत्री छगन भुजबळ म्हणाले, बेस्ट कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक आणि निकाल याचा संबंध थेट कामगार संघटनांशी आहे. मुंबई महानगराच्या इतिहासात विविध संघटना आणि कामगार नेते होऊन गेले. यामध्ये सर्वात आधी नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांना संघटित केले.
कामगार नेते पी. डीमेलो, कॉम्रेड डांगे, दत्ता सामंत यांनी गिरणी कामगारांचे नेतृत्व केले. श्री कुलथे हे मंत्रालयातील कामगारांचे नेते होते. जॉर्ज फर्नांडिस आणि त्यांचे सहकारी शरद राव यांनी महापालिका कर्मचाऱ्यांचे नेतृत्व केले. शशांक राव हे महापालिका कर्मचारी नेते शरद राव यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे महापालिका कर्मचारी संघटनेत यांचा प्रभाव राहिला आहे.
एखाद्या संस्थेत एखादी नवी कर्मचारी संघटना शिरगाव करते तेव्हा प्रस्थापित संघटनांचे नेते अस्वस्थ होतात. बेस्ट कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी वेगळ्या प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे वर्चस्व निर्माण झाल्यास आपले काय अशी भीती आणि शंका प्रस्थापित नेत्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. त्यामुळेच बेस्ट कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीच्या निकालावर त्याचा प्रभाव पडला असावा.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावर देखील भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जनतेचे प्रश्न घेऊन कोणीही मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो. काँग्रेसचे नेते त्यांना भेटतात, ती शरद पवार देखील मुख्यमंत्र्यांना भेटतात. त्यामुळे राज ठाकरे भेटले यामध्ये काही वेगळे घडले असे वाटत नाही.