
टोकाची टीका करणाऱ्या जरांगेंबाबत अखेर CM फडणवीसांनी मौन सोडलं !
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरले आहेत. येत्या 29 ऑगस्टला त्यांनी मुंबईत येऊन आरक्षणासाठी लढा देण्यासाठीचा निर्धार केला आहे
मात्र, यावेळी ते जास्तच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत असून त्यांनी यावेळीही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केल्याचं दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मराठा आरक्षणाचं काम देवेंद्र फडणवीस यांनी करून दिलं नाही, असा आरोप जरांगेंनी केला आहे.
शिवाय मुख्यमंत्र्यांवर टीका करताना मनोज जरांगेंनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ शेअर करत जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द वापरल्याचं म्हटलं आहे.
चित्रा वाघ यांच्या पोस्टनंतर भाजप आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, यांच्यासह नितेश राणे यांनी मनोज जरांगेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं. पण, या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, अखेर आता फडणवीसांनी मौन सोडलं असून त्यांनी जरांगेच्या आरोपांवर भाष्य केलं आहे.
“जो आपल्याला शिवरायांचा मावळा मानत असेल तो खालची भाषा वापरणार नाही. महिलेच्या बाबतीत खालच्या पातळीचं वक्तव्य करणार नाही,” असं म्हणत त्यांनी जरांगेंनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. तसंच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी त्यांना मराठा आरक्षणाचं काम करू दिलं नाही.
एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मराठा आरक्षणाचं काम फडणवीसांनीच करून दिलं नाही या जरांगेंच्या आरोपांना देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, “आमच्यामध्ये कोणीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही एक आहोत. एकनाथ शिंदे साहेब असं नाही म्हणाले माझे आणि शिंदे साहेबांचं चांगलं आहे. कोणीही काड्या टाकायचा, बांबू टाकायचा प्रयत्न केला तरी एकनाथ शिंदे आणि माझे चांगले संबंध आहेत.”
जरांगेंचं स्पष्टीकरण
दरम्यान, “मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी काही बोललोच नाही. मात्र, बोलण्याच्या ओघातून माझ्या तोंडातून तसा काही शब्द गेला असेल तर तो मी माघारी घेईन,” असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. मराठवाड्यात ही बोलीभाषा आहे. पण आमच्या आई-बहिणींची डोकी फुटली तेव्हा दिसलं नाही का? असा सवालही जरांगेंनी केला आहे.