
महाराष्ट्राच्या राजकारणातील आजची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. महायुती सरकारकडून भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आले आहेत. संजय सावकारे यांच्या जागी आता पंकज भोयर यांच्याकडे भंडाऱ्याचे पालकत्व देण्यात आले आहे. मंत्री संजय सावकारे यांचे डिमोशन का करण्यात आले? याबाबतची सध्या कोणतेही कारण समोर आले नाही. संजय सावकारे यांच्यावर आता बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे
राज्याचे वस्त्र उद्योगमंत्री संजय सावकारे यांच्याकडून भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. उपसचिव दिलीप देशपांडे यांनी सोमवारी रात्री याबाबतचे पत्र जाहीर केले होते. सावकारे यांच्याजागी पंकज भोयर यांना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून सावकारे भंडाऱ्याचे पालकमंत्री होते, पण झेंडामंत्री म्हणून त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. फक्त १५ ऑगस्ट अथवा २६ जानेवारी या काळातच सावकारे भंडाऱ्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत होता.
भंडारा जिल्ह्यातील कोणत्याही समस्या, आढावा बैठकीसाठी फक्त हजेरी लावली जायची. भंडारा अथवा परिसरातील पालकमंत्री हवा, अशी नागरिकांची मागणी होती. त्यामुळेच सावकारे यांची उलचबांगडी केली असावी असा अंदाज बांधला जातोय. पंकज भोयर हे भंडाऱ्याच्या जवळच्या वर्धा जिल्ह्यातील आहेत. त्यांना भंडारा जिल्ह्याची जाण मोठ्या प्रमाणात असू शकते. आगामी नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यावर पकड मजबूत करण्यासाठी भोयर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे का? अशी चर्चा आहे.
पंकज भोयर यांच्याकडे गोंदियामधील सह पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. त्याशिवाय आता भंडाऱ्याचीही जबाबादारी दिली आहे. भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यावर भाजपची पकड मजबूत व्हावी, त्यासाठीच भाजपने भोयर यांच्याकडे ही नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संजय सावकारे यांचे डिमोशन करण्यात आले आहेत. भंडाऱ्याच्या पालकत्वाची जबाबादरी पंकज भोयर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
पंकज भोयर काय म्हणाले ?
वरिष्ठ नेतृत्वाचे आभार व्यक्त करतोय. मागील सहा महिन्यात केलेल्या कामाची दखल घेत वरिष्ठांनी माझ्यावर हा विश्वास दाखवला आहे. माझी जबाबदारी वाढली आहे. याची जाण ठेवून भंडारा जिल्ह्यात चांगले काम करू, असा विश्वास भोयर यांनी दिली. संजय सावकारे यांचेही काम चांगले आहे. भौगोलिकदृष्ट्या भंडारा दूर पडत असेल त्यामुळे हा निर्णय घेतलेला असू शकतो. वर्धा जिल्ह्याप्रमाणेच आता भंडाऱ्यातही अनेक योजना आणण्याचा प्रयत्न करणार आहे, असे भोयर यांनी सांगितले.