
जरांगेंसाठी ओएसडी राजेंद्र साबळे यांच्याकडे पाठवला निरोप !
मराठा आरक्षणासाठी मंगळवारी मुंबईच्या दिशेने कुच करण्यासाठी सज्ज झालेल्या मनोज जरांगे पाटील यांचे मन वळविण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिला डाव टाकला असून थेट स्वीय सहायक राजेंद्र साबळे यांना जरांगेच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत पाठविले आहे.
राजेंद्र साबळे हे जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत. या भेटीबाबत बोलताना साबळे यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, याआधीही त्यांच्याशी फोनवर चर्चा झाली आहे. त्यांचा मार्ग कसा असणार आहे, त्यांना येण्यासाठी कोणतीही अडचण होणार नाही, हे जाणून घेण्यासाठी आलो आहे.
विनंती हीच केली आहे की, गणेशोत्सव आहे. त्याअनुषंगाने आंदोलन पुढे ढकलू शकता का, याबाबत विनंती करणार आहे. तसेच मराठा आंदोलकांना त्रास होऊ नये, यासाठी त्यांचा मार्ग कोणता असेल, याची माहिती घेण्यासाठी आलो आहे. मार्ग कसा असेल, त्याबाबत उपाययोजना सुरू आहे, असेही साबळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी आपण आंदोलनावर ठाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. आतापर्यंत खूप चर्चा झाली. आरक्षण नाही तर आंदोलनही मागे नाही, असे त्यांनी सांगितले आहे. बुधवारी मुंबईच्या दिशेने जाण्यावर त्यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करत मराठा समाजाला आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
आंदोलनाची तारीख बदलणार नाही. आता आंदोलन निर्णायक टप्प्यावर आहे. त्यामुळे मराठ्यांनी साथ द्यावी. मी तर मुंबईला जाणार आहे. तुम्हीही मुंबईत पोहचा, असे जरांगे पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी ओएसडींना पाठविले आहे. त्यांच्याशी चर्चा करणार आहे. सगळ्यांसमोरच ही चर्चा होईल, असेही जरांगे पाटलांनी स्पष्ट केले.