
मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीतून मोठी बातमी; नेमका काय झाला निर्णय ?
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजानं मुंबईत आंदोलनाला सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे.
मुंबईमध्ये लाखोच्या संख्येनं मराठा बांधव एकत्र आले आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला असून, जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
दरम्यान मराठा बांधव आणि मनोज जरांगे पाटील मुंबईला यायला निघाले तेव्हापासूनच सरकारचं शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार अशा बातम्या समोर येत होत्या, मात्र सरकारच्या शिष्टमंडळानं काही त्यांची भेट घेतली नव्हती. अखेर आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मोठा निर्णय झाला आहे, शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. यामुळे भेटीमुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर जी काही एक प्रकारची कोंडी निर्माण झाली होती, ती फुटण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील आणि शिष्टमंडळ यांच्यामध्ये चर्चा होऊ शकते.
आज मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीला समितीचे सर्व सदस्य हजर होते. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. या बैठकीत नेमकं काय ठरलं? याबाबत विखे पाटील यांनी माहिती दिली आहे.
नेमकं काय म्हणाले विखे पाटील?
आज उपसमितीच्या बैठकीत आम्ही सर्वच सदस्य उपस्थित होतो. चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, उदय सामंत यांच्यासह सर्वच सदस्य या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. अतिशय सकारात्मक भूमिका आमच्या सर्वांची आहे. या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे, हीच सरकारची देखील भूमिका आहे, आणि म्हणून या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे साहेब, कोकणाचे विभागीय आयुक्त आणि आमच्या विभागाचे सचिव त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी जाणार आहेत, आणि चर्चा झाल्यानंतर आणखी काही मुद्दे उपस्थित झाल्यास त्यावर पुन्हा चर्चा करू असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.