
लवकरात लवकर…
मनोज जरांगे पाटील हे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षणाच्या मागण्यासाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय आपण उपोषण सोडणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.
त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मात्र, काही मराठा आंदोलक हे आझाद मैदान सोडून चक्क मुंबई महापालिकेच्या समोर येऊन ठिय्या आंदोलन करत आहेत. सध्या मराठा आंदोलनामुळे मुंबईमध्ये मोठी वाहतूककोंडी झाली आहे. पोलिस हे आंदोलन करणाऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
आता नुकताच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना मोठे आवाहन केले. बीएमसी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये ठिय्या करणाऱ्या आंदोलकांना जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर येण्यास सांगितले आहे. लवकरात लवकर आझाद मैदानावर पोहोचा असे त्यांनी म्हटले. मुंबईकरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यायला सांगितले आहे. यासोबतच रस्त्यावर लावलेली सर्व वाहने पार्किंग आणि मोकळ्या मैदानात लावण्यास त्यांनी सांगितले आहे. पिण्याचे पाणी आणि बाथरूमची व्यवस्था नसल्याने मुले मुंबई महापालिकेच्या इमारतीबाहेर जमल्याचे त्यांनी म्हटले.
सकाळपासूनच सीएसटीच्या पुढे ठिय्या आंदोलन करताना मराठा समाजाचे कार्यकर्त्ये दिसले. यामुळे मोठी वाहतूककोंडी झाली. यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलांचे पाणी आणि अन्न बंद केल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यांंनी म्हटले की, राज्यामध्ये काही झाले आणि राज्यअस्थीर झाले तर याला फक्त आणि फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असतील. बीएमसीच्या रस्त्यावर सकाळपासून मराठा आंदोलक ठिय्या करत आहेत.
आता मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनानंतर बीएमसीच्या रस्ता मोकळा होता का? हे पाहण्यासारखे आहे. यासोबतच मोठा आरोप करत जरांगे पाटील यांनी म्हटले की, परिसरातील हॉटेल दुकाने बंद करण्यात आली आहेत. मराठ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका, असाहा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीका करणे जरांगे पाटील हे टाळताना दिसत आहेत.