
मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत उपोषणाला बसले आहेत. तर दुसऱ्या बाजूला, मराठा आरक्षणासाठी गठीत करण्यात आलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे सदस्य आणि काही सनदी अधिकाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानात जाऊन भेट घेतली.
यावेळी संदीप शिंदे यांनी सरकार मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी चालू असलेल्या कामांची आणि समोर असलेल्या आव्हानांची जरांगे यांना माहिती दिली. तसेच त्यांनी सांगितलं की हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारने तत्वत: मंजुरी दिली आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी संदीप शिंदे यांना सांगितलं की “हैदराबादसह सातारा गॅझेट तातडीने लागू करा. तर, औंध संस्थान व बॉम्बे गॅझेटियरबाबत निर्णय घेण्यासाठी आम्ही तुम्हाला मुदत देऊ.” यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी त्यांनी मनोज जरांगेंच्या मागण्यांवर टिप्पणी केली.
कायदेशीर प्रक्रिया टाळून कार्यवाही करता येणार नाही : फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हैदराबाद गॅझेटसंदर्भात आम्ही न्या. संदीप शिंदे यांची समिती तयार केली आहे. मुदत देणं न देण्याच्या इथे प्रश्न येत नाही. आपण तयार केलेल्या शिंदे समितीमुळे मराठा समाजातील कुटुंबांच्या कुणबी नोंदी सापडल्या. त्यातून आपण सदर कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्रे दिली. आपण हैदराबाद गॅझेटचं काम या समितीकडे दिलं आहे. त्याच संदीप शिंदे यांनी काल मनोज जरांगे यांना भेटून सांगितलं की यात काही बदल करायचे आहे. त्यासाठी वेळ लागेल. मात्र, मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे की ‘आत्ताच द्या, इथे मुंबईतच आरक्षण द्या.’ परंतु, त्यासंदर्भात ज्या कायदेशीर प्रक्रिया आहेत त्या पार न पाडता पुढील कार्यवाही करून कसं चालेल?”
आडमुठ्या भूमिकेतून तोडगा निघणार नाही : मुख्यमंत्री
“संदीप शिंदे यांनी मनोज जरांगे यांना माहिती दिली. प्रक्रिया करावी लागेल असं सांगितलं. शेवटी याबाबत चर्चेतून मार्ग निघू शकतो. परंतु, आडमुठ्या भूमिकेतून तोडगा निघणार नाही. सरकार हे कायद्याने चालतं. सरकार कायदेशीर मार्गाने सर्व प्रश्न सोडवेल. कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्यांचा वापर करून आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
यावेळी फडणवीस यांना विचारण्यात आलं की महायुती सरकार मनोज जरांगे यांना पटेल असा निर्णय घेईल का? त्यावर फडणवीस म्हणाले, “मला मनोज जरांगे यांच्या मनात शिरता आलं असतं तर हे आंदोलनच संपलं असतं.