
दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी – महेश भोये.
डहाणू तालुक्यातील गंजाड कोहराली पाडा परिसरात सोमवारी संध्याकाळी भीषण अपघात घडला. मुंबई–वडोदरा नव्या महामार्गावरून भरधाव वेगाने जात असलेली एक इको कार लोखंडी दुभाजकावर आदळली. या अपघातात कारचालक बच्चू बाबू मासमार याचा जागीच मृत्यू झाला असून पाच प्रवासी जखमी झाले आहेत.
संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मृत्यू झालेला मासमार आणि इतर पाच असे एकूण सहा जण गाडीत प्रवास करत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. यात महेंद्र सुभाष आहडी यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर तसेच आणखी एका जखमीवर धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. उर्वरित तीन जखमींना किरकोळ दुखापत झाल्याने प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. हे सर्व चरी कोटबी या गावातील असून घरी परतत असताना गाडी नियंत्रण सुटून लोखंडी गार्डला धडकली आणि भीषण अपघात घडला. विशेष म्हणजे नव्या महामार्गाचे काम अद्याप सुरू असून पूर्ण झालेले नाही. तरीदेखील या मार्गावरून वाहने सोडली जात आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत असून प्रवाशांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे.