
राज्य सरकारने आंदोलनातील मागण्या मान्य करीत ‘जीआर’ हाती सोपविताच मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाले. आज मराठा समाजासाठी आणि राज्यासाठी सोन्याचा दिवस आला. माझ्या जातीचं कल्याण झालं..
मराठ्यांनी मुंबईत पाय ठेवला आणि मुंबई काबीजही केली, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. सोबतच, मागण्या मान्य झाल्याने तुमचे-आमचे वैर संपले, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मंत्रिमंडळ उपसमितीचे आभार मानून या निर्णयाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांचे कल्याण झाले. माझी लेकरे आता सुखी राहतील. खरे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा सुवर्णक्षण आहे. कारण, विदर्भात आधीच आपण नोंदी दिल्या आहेत, खान्देशात आणि कोकणातदेखील दिल्या आहेत. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचेच कल्याण झाले.
आता माझ्या समाजाला खाली मान घालून चालायची गरज नाही. आम्ही मुंबई काबीज करून दाखवली. मराठ्यांचा असा विजय गेल्या 75 वर्षांत कधीही झाला नव्हता, असे सांगत त्यांनी उपोषण सोडल्याची घोषणा केली. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते लिंबूपाणी घेत जेव्हा जरांगे यांनी उपोषण सोडले तेव्हा आझाद मैदानात एकच जल्लोष झाला. संपूर्ण मैदानात गुलाल उधळण्यात आला. राधाकृष्ण विखे-पाटील आणि उपस्थित मंत्र्यांवरही गुलाल टाकण्यात आला. जरांगे यांनाही सहकार्यांनी विजयी गुलाल लावला. समोरचा जल्लोष आणि मोठ्या संघर्षानंतर मिळालेला विजय पाहून जरांगे यावेळी भावुक झाले होते. त्यानंतर सर्वांना अभिवादन करून त्यांनी रुग्णवाहिकेने छत्रपती संभाजीनगरचा रस्ता धरला.
उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना हाक
मागण्या मान्य झाल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जरांगेंना उपोषण सोडण्याची विनंती केली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंदोलनस्थळी यावे, असे आवाहन जरांगे यांनी केले. आंदोलन संपले, तुमचे आमचे वैर संपले, असेही ते म्हणाले. तथापि, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी मला यासंदर्भात अधिकार दिल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे जरांगे यांनी त्यांच्या हस्ते लिंबूपाणी घेत उपोषण सोडले.
मंत्री छगन भुजबळराज्य सरकारने मराठा समाजाला ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, अशांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात जो शासन निर्णय घेतला आहे. त्याचा सखोल अभ्यास आमच्याकडून आणि आमच्या टीमकडून चालू आहे. यामध्ये आम्ही विधिज्ञांशी देखील चर्चा करत आहोत. त्यामुळे यावर सविस्तर अभ्यास करून मी भूमिका मांडेन.