दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :“आपल्या सर्वांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अपार श्रद्धा आहे. महाराजांनी रयतेसाठी केलेले कार्य आणि दाखवलेला समतेचा, बंधुत्वाचा व सामाजिक न्यायाचा मार्ग आपल्याला सदैव प्रेरणा देतो. त्यामुळे मतदारसंघात जवळपास २५ पुतळ्यांचे सुशोभीकरण करून उभारणी करण्यात येत आहे,” असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी केले.
ते उदगीर तालुक्यातील हंडरगुळी (बा.) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
हंडरगुळी येथे उभारलेला ऐतिहासिक पुतळा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात व थाटामाटात अनावृत झाला.
या प्रसंगी राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, माजी उपसभापती रामराव बिरादार, तालुकाध्यक्ष बालाजी भोसले पाटील, भाजप मंडळाध्यक्ष रामदास बेंबडे, शहराध्यक्ष अमोल अनकल्ले, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे यांच्यासह विविध पक्षांचे नेते, सरपंच व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. संजय बनसोडे पुढे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या नाट्यगृहासाठी २२ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच नळेगाव रोडवर कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य ऐतिहासिक महाप्रवेशद्वार लवकरच पूर्ण होणार आहे.”
________________________________________
हाळी–हंडरगुळी ही भूमी खऱ्या अर्थाने ‘पशुपंढरी’ म्हणून ओळखली जाते. येथील ऐतिहासिक जनावरांचा बाजार नेहमीच बळीराजाला आधार देत आला आहे. या बाजारामुळे उदगीर तालुक्याचे नाव राज्यभर आणि देशभर पोहोचले असल्याचे आ. बनसोडे यांनी नमूद केले.
________________________________________
छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झालेल्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला उपस्थित राहणे हा आपल्या सर्वांसाठी मोठा अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता येलमटे व नामदेव सुळे यांनी केले. हाळी–हंडरगुळी परिसरातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले.
