दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रताप नागरे
वाशिम, दि. २० जानेवारी
वाशिम जिल्ह्यातील नागरिकांसाठी दिलासादायक व काळानुरूप निर्णय घेत पोलीस अधीक्षक कार्यालयाने चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची सेवा पूर्णपणे ऑनलाईन केली आहे. यामुळे आतापर्यंत प्रमाणपत्रासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता हे प्रमाणपत्र घरबसल्या ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या ऑनलाईन व्यवस्थेमुळे नागरिकांचा वेळ, खर्च आणि श्रम वाचणार असून संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व जलद होणार आहे. शासनाच्या ‘आपले सरकार’ उपक्रमाअंतर्गत ही सेवा प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
दरम्यान, जिल्हा प्रकल्प प्रमुख (आपले सरकार) सौरभ जैन यांनी स्पष्ट केले की, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता नाही. नागरिकांनी आपले सरकार पोर्टल, नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर मार्फत तसेच घरबसल्या ऑनलाईन अर्ज केल्यास, ठराविक कालावधीत प्रमाणपत्र ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नागरिकांनी https://pcs.mahaonline.gov.in/Forms/Home.aspx या संकेतस्थळावर लॉगिन करून या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. डिजिटल इंडिया आणि ई-गव्हर्नन्सच्या दिशेने टाकलेले हे पाऊल नागरिकाभिमुख प्रशासनाचा उत्तम नमुना ठरत असून, भविष्यात अशा आणखी सेवांचा विस्तार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
