दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रताप नागरे
वाशिम, दि. २० जानेवारी
बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथेला आळा घालण्यासाठी चाईल्ड लाईन १०९८ च्या सतर्कतेमुळे जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील ग्राम हराळ येथे होऊ घातलेला सोळा वर्षीय बालिकेचा बालविवाह वेळेत रोखण्यात आला. एका गोपनीय फोन कॉलमुळे प्रशासन यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली आणि एका बालिकेचे बालपण तसेच भविष्य सुरक्षित झाले.
मिळालेल्या माहितीनुसार संबंधित बालिकेच्या वयाची तातडीने खातरजमा करण्यात आली. त्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उत्तम शिंदे, परिविक्षा अधिकारी गणेश ठाकरे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले यांच्या निर्देशानुसार संयुक्त पथकाची तात्काळ नेमणूक करण्यात आली.
चाईल्ड लाईनचे प्रकल्प समन्वयक अविनाश सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल देशपांडे, प्रतिभा घनसावत, राम वाळले व निलिमा भोंगाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन बालिका व तिच्या पालकांचे समुपदेशन केले. बालविवाहाचे कायदेशीर परिणाम, अल्पवयीन विवाहामुळे होणारे आरोग्यविषयक धोके तसेच मुलीच्या शिक्षणावर व संपूर्ण भवितव्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
समुपदेशनानंतर पालकांनी मुलीचे वय पूर्ण १८ वर्षे होईपर्यंत विवाह न करण्याची लेखी हमी दिली. त्यामुळे होऊ घातलेला बालविवाह यशस्वीपणे रोखण्यात आला.
या संपूर्ण कारवाईसाठी तालुका संरक्षण अधिकारी बंडू धनगर, संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांनी मोलाचे सहकार्य केले.
बालविवाह निर्मूलनासाठी महिला व बाल विकास विभागाच्या अधिनस्त असलेल्या चाईल्ड लाईनच्या तत्परतेमुळे एका निष्पाप बालिकेचे बालपण व भविष्य सुरक्षित झाले असून, समाजानेही अशा प्रकरणांची माहिती निर्भयपणे पुढे आणावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
