मनोज जरांगेंचा हल्लाबोल म्हणाले; राहुल गांधींच्या सांगण्यावरून…
मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य शासनाने काढलेला जीआर रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी काल (ता.10) नागपुरात ओबीसी समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला.
मात्र, हा मोर्चा ओबीसींचा नव्हता तर तो काँग्रेसचा होता. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सांगण्यावरूनच तो काढण्यात आला होता, अशी टीका मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
आमच्या हक्काच्या कुणबी नोंदी सापडल्या असून हैदराबाद गॅझेटमध्येही नोंदी सापडत आहेत. त्यानंतर काहींनी राजकारण सुरू केलं. धनगर समाजाला ‘एसटी’ प्रवर्गामधून आरक्षण मिळावं यासाठी दीपक बोऱ्हाडेंनी बरेच दिवस उपोषण केले. त्यांच्या आंदोलनाला मंत्री छगन भुजबळ यांनी भेट दिली नाही.
धनगर समाज त्यांना फक्त मोर्चासाठी पाहिजे. ते जर खरेच समाजासाठी लढले असते तर त्यांना आरक्षण मिळाले असते, असं म्हणत जरांगेंनी छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. तसंच यावेळी ते म्हणाले, आमच्या आंदोलनानंतर हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
त्यामुळे आता तो रद्द करणार नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आम्ही कधी बोललो नाही. मात्र, त्यांचे नेते अनिल देशमुख आधी बोलले. पवारांनी ओबीसींना 16 टक्के आरक्षण दिले. ते लोक तरी त्यांच्याकडे राहिले का? असा सवाल करत शरद पवारांना आता पश्चाताप झाला असेल. शिवाय आमच्यासाठी आरक्षण महत्त्वाचे आहे, राजकारण नाही, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.
