विखे पाटील; शिवेंद्रराजेंनाही भाजपमध्ये 5 वर्षातच मानाचे पान…
राज्यातील गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला मुहूर्त लागला आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 244 नगरपालिका व 44 नगरपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून उमदेवार अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.
यामध्ये भाजपने आघाडी घेतली असून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची यादी तयार केली आहे. येत्या दोन दिवसातच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची घोषणा होणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून बिहारची मोहीम फत्ते होताच विनोद तावडेंचं महाराष्ट्रात कमबॅक झाले असून त्यासोबतच विखे पाटील, शिवेंद्रराजेंनाही भाजपमध्ये 5 वर्षातच मानाचे पान देण्यात आले आहे.
राज्यात आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीची जोरदार तयारी सर्वच राजकीय पक्षाकडून केली जात आहे. राज्यातील निवडणूक कार्यक्रमानुसार दोन डिसेंबरला नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबरला निवडणुकीची मतमोजणी आहे.
आगामी काळात होत असलेल्या या निवडणुकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांचा यामध्ये समावेश आहे.
या बड्या नेत्यांचा समावेश
भाजपने (BJP) आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, पीयूष गोयल, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, मुरलीधर मोहोळ, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गणेश नाईक, जयकुमार रावल, शिवेंद्रराजे भोसले या नेत्यांचा समावेश आहे.
येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षाकडून सुरु आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 244 नगरपालिका व 44 नगरपंचायतीच्या निवडणूका होणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. तर तिसऱ्या टप्प्यात राज्यात महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
विनोद तावडेंचे कमबॅक
बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारी बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांच्यावर होती. आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या काळात होत असल्याने या निमित्ताने विनोद तावडे यांचे राज्याच्या राजकारणात कमबॅक झाले आहे. त्यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकातील स्टार प्रचारकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
