गणेश गावडे-पाटस प्रतिनिधी
दौंड: तालुक्यातील गिरीम गावच्या हद्दीत, पाटस-दौंड अष्टविनायक रस्त्यावरील ‘हॉटेल जगदंबा’ येथे ७ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटावेळी हॉटेलमधील एकूण १२ कामगार गंभीररीत्या भाजले होते, ज्यामध्ये महिला व बालकामगारांचाही समावेश होता. या दुर्घटनेत होरपळलेल्यांपैकी ५ जणांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असून, मृतांमध्ये एका १४ वर्षीय बालकामगाराचाही समावेश आहे. या सर्व मृतांमध्ये दीपक भूपसिंग वर्मा (वय २५), मणराम अत्तरसिंग वर्मा (वय २१), कुकुरन कलमसिंह निषाद (वय १४), कन्हैया बंगालीराम वर्मा (वय २०) आणि रामप्रकाश कालीचरण वर्मा (वय २४) यांचा समावेश असून, हे सर्व कामगार उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्याचे रहिवासी होते. सध्या ब्रजमोहन पुरुषोत्तम वर्मा यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीने प्रशासकीय निष्काळजीपणावर गंभीर आरोप केले आहेत. तपासादरम्यान हॉटेलमध्ये एकूण २२ गॅस सिलिंडर आढळून आले, ज्यापैकी १२ घरगुती (LPG) सिलिंडरचा बेकायदेशीररीत्या व्यावसायिक वापरासाठी वापर केला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा प्रकार ‘अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५’ चा भंग असून सार्वजनिक सुरक्षेला थेट धोका निर्माण करणारा गुन्हा असल्याचे ग्राहक पंचायतीचे दौंड शहराध्यक्ष गणेश जगताप यांनी म्हटले आहे. हॉटेलला इतक्या मोठ्या प्रमाणात घरगुती सिलिंडरचा पुरवठा होणे हे गॅस वितरक, त्यांचे एजंट आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय शक्य नसल्याचा आरोप करत या संपूर्ण साखळीची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
याप्रकरणी हॉटेल मालक व व्यवस्थापकावर केवळ प्राथमिक गुन्हा दाखल झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, त्यांच्यावर ‘कलम ३०४’ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच बेकायदेशीर गॅस पुरवठा करणारे वितरक आणि जबाबदार पुरवठा अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून मृत कामगारांच्या कुटुंबियांना तातडीने भरीव आर्थिक भरपाई देण्यात यावी, असे निवेदन शासनाला देण्यात आले आहे. ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना जखमींना कोणाच्या परवानगीने उत्तर प्रदेशला हलवण्यात आले, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.
