दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा उदगीर, प्रतिनिधी- अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (अजित पवार गट) जळकोट तालुक्यातून मोठा राजकीय धक्का बसला आहे. अजित पवार गटातील जळकोट येथील पदाधिकारी शांताताई लक्ष्मणराव आदावळे व रमण लक्ष्मणराव आदावळे यांनी आज बाभळगाव येथील निवासस्थानी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करून राष्ट्रवादीला उघड आव्हान दिले.
या पक्षप्रवेशामुळे जळकोट तालुक्यात अजित पवार गटातील अस्वस्थता चव्हाट्यावर आली असून, संघटनात्मक गळती सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर झालेला हा पक्षांतराचा धक्का राष्ट्रवादी काँग्रेससाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
काँग्रेस पक्षाच्या वतीने या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. काँग्रेस नेत्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की, ग्रामीण भागातील कार्यकर्ते आता दुहेरी नेतृत्व व गटबाजीला कंटाळून काँग्रेसकडे परतत आहेत.
या वेळी लातूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शिलाताई पाटील, जळकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारोती पांडे, व्यंकट केंद्रे, विश्वनाथ केंद्रे, संजू केंद्रे, सचिन केंद्रे, अंबादास घोनसे, नारायण मालुसुरे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या पक्षप्रवेशामुळे जळकोट तालुक्यासह संपूर्ण लातूर जिल्ह्यात राजकीय समीकरणे बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे मानले जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून होणारे पक्षांतर हे केवळ अपवाद नसून, अजूनही अनेक पदाधिकारी काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
