दिवा :- दिवा शहराचा विकास केला सांगता मग दिव्यात इतक्या वर्षात हॉस्पिटल का बांधू शकले नाहीत? हे सत्ताधारी शिंदे गटाने स्पष्ट करावे असा घनाघात प्रचारादरम्यान शिवसेनेचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख व प्रभाग २८ चे उमेदवार ॲड.रोहिदास मुंडे यांनी प्रचारादरम्यान केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रभाग २८ मध्ये योगेश निकम, ज्योती राजकांत पाटील आणि स्वतः ॲड.रोहिदास बामा मुंडे हे नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उभे आहेत. त्यांची लढाई थेट शिंदे गटाच्या उमेदवारांसमोर आहे. प्रभाग २८ मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांचा प्रचार जोमाने सुरू असून ॲड.रोहिदास मुंडे, ज्योती पाटील यांच्याकडे जनता आश्वासक चेहरा म्हणून पहात असल्याचे नागरिक बोलत आहेत.
मागील अनेक वर्षापासून दिवा शहरातील नागरिकांची हेळसांड होत असून आरोग्याच्या बाबतीत येथील जनतेला कोणी वाली नाही अशी परिस्थिती आहे. दिवा शहरातील नागरिकांना कल्याण डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई यासारख्या शहरांवर आरोग्यासाठी अवलंबून राहावे लागते. इमर्जन्सी मध्ये हॉस्पिटलला नेई पर्यंत अनेकांना आपला जीव गमावा लागतो. मात्र या गंभीर परिस्थितीकडे टेंडर बाजी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना लक्ष द्यायला वेळ नाही अशीच स्थिती असल्याचा घनाघात ॲड.रोहिदास मुंडे यांनी प्रचारादरम्यान केला आहे.
दिवा शहरासाठी हॉस्पिटल उभारणे फार अवघड गोष्ट नाही. मात्र सत्ताधाऱ्यांची दिवा शहरात हॉस्पिटल व्हावी अशी इच्छा दिसत नाही. इतक्या वर्षात शहरातील सत्ताधारी हा निर्णय का घेऊ शकले नाही? त्याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे. आम्ही जर सत्तेत आलो तर मी ॲड.रोहिदास मुंडे, ज्योती पाटील आणि योगेश निकम प्रभाग २८ मधील जनतेला सांगू इच्छितो की, पहिल्या वर्षभरातच येथे भाड्याने जागा घेऊन तात्काळ हॉस्पिटल सुरू करू आणि जनतेला दिलासा देऊ. या ठिकाणी लहान मुलांसाठी, महिलांसाठी आणि नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष उभारून दाखवू ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची गॅरंटी आहे असा ठाम निर्धार ॲड.रोहिदास मुंडे यांनी प्रचारादरम्यान केला आहे. दिव्यातील आरोग्य व्यवस्थेकडे सत्ताधारीत दुर्लक्ष का केले? याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे आणि मग मत मागावीत असेही त्यांनी या प्रचारादरम्यान म्हटले आहे.
