पालघर प्रतिनिधी:- मिलिंद चुरी
पालघर:-पालघर जिल्ह्यात लहान मुले पळवून नेणारी कोणतीही संघटित टोळी सक्रिय नसल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले असून, नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालघर पोलिस दलाने केले आहे. दांडी (ता. जि. पालघर) येथील बस स्टॉपवर ९ जानेवारी रोजी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास १३ वर्षीय दोन अल्पवयीन मुली बसची वाट पाहत असताना चादरी विक्रीसाठी गावात आलेल्या काही व्यक्तींनी त्यांच्या मोबाईलमध्ये मुलींचे फोटो काढले व त्यांच्या ठावठिकाणाबाबत विचारपूस केली. या प्रकारामुळे संशय निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी संबंधितांना ग्रामपंचायत कार्यालयात आणले. मात्र, गावकऱ्यांनी कायदा हातात न घेता तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच सातपाटी पोलीस ठाणे व बोईसर विभागातील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी दांडी येथील तक्रारीवरून सातपाटी पोलीस ठाण्यात तीन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता कलम ७८ तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ चे कलम १२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सातपाटी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
दरम्यान, पालघर जिल्ह्यात सन २०२५ मध्ये लहान मुले किंवा मुली पळवून नेल्याप्रकरणी १९२ गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी १८२ मुले/मुली सुरक्षितरीत्या मिळून आले आहेत. उर्वरित १० प्रकरणांचा तपास सुरू आहे. या प्रकरणांचे अवलोकन करता बहुतांश मुले ही अल्पवयीन प्रेमप्रकरणे किंवा घरगुती वादातून स्वतःहून घर सोडून गेल्याचे निष्पन्न झाले आहे.
या पार्श्वभूमीवर, “अल्पवयीन मुले पळविणारी कोणतीही टोळी जिल्ह्यात कार्यरत नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास कायदा हातात न घेता तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा,” असे आवाहन पालघर पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.
