प्रतिनिधी – निहाल मनेर
औंध :
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औंध जिल्हा परिषद गटातील महिलांसाठी अंकुशभाऊ गोरे युवा मंच यांच्या वतीने औंध येथे आयोजित हळदीकुंकू समारंभ व स्नेहभोजन हा केवळ सामाजिक कार्यक्रम न राहता, संपूर्ण औंध गटाला विकासाचा ‘रोड मॉडेल’ बनवण्याच्या संकल्पाचा ठोस संदेश देणारा ठरला. या कार्यक्रमास औंध गटातील विविध गावांमधून हजारोंच्या संख्येने महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमास अंकुश गोरे, त्यांच्या सुविद्य पत्नी व औंध जिल्हा परिषद गट नेत्या भारतीताई गोरे, औंध पंचायत समिती गण नेते दिनेश उर्फ दादासाहेब इंगळे, सिंधुताई जगदाळे, उद्धव महाराज अडसुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना संतोष भोसले यांनी औंध परिसरातील महिलांच्या पाणीपुरवठ्यासह दैनंदिन प्रश्नांकडे लक्ष वेधले. तसेच अंकुशभाऊ गोरे युवा मंचच्या माध्यमातून औंध जिल्हा परिषद गटाला इतर गटांसाठी आदर्श ठरेल असा ‘विकासाचा रोड मॉडेल’ उभारण्याचा आराखडा मांडला. संदिप गुरव यांनीही अंकुश गोरे यांच्या कार्याचा गौरव करत, नियोजनबद्ध विकासामुळे औंधचा चेहरामोहरा बदलणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
अंकुश गोरे यांनी औंध जिल्हा परिषद गटातील आतापर्यंतच्या विकासकामांचा आढावा घेत येणाऱ्या काळातील स्पष्ट, कालबद्ध आणि परिणामकारक रोडमॅप जनतेसमोर मांडला. पुढील एका वर्षात गटातील प्राधान्याच्या विकासकामांना गती देत, औंध गटाला शुद्ध पाणी, दर्जेदार शिक्षण आणि मूलभूत सुविधांच्या बाबतीत मॉडेल गट बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सर्व गावांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी व्यापक योजना राबविण्यात येणार असून, जिल्हा परिषद मराठी शाळांचे डिजिटलीकरण, आधुनिक सुविधा, आरओ प्लांट बसविणे तसेच विद्यार्थ्यांसाठी ‘बोलक्या भिंती’ उभारण्यात येणार आहेत. “औंध जिल्हा परिषद गट हा केवळ मागणी करणारा नव्हे, तर नियोजनातून विकास साधणारा गट म्हणून ओळखला जावा, हाच आमचा उद्देश आहे,” असे अंकुश गोरे यांनी सांगितले.
यावेळी भारतीताई गोरे यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत, महिलांच्या कलागुणांना वाव देणारे उपक्रम, विशेष आरोग्य तपासणी शिबिरे आणि जनजागृती मोहिमा राबविण्याचा मानस व्यक्त केला. शुद्ध पिण्याचे पाणी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असून मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा योजनांना चालना देऊन हा अधिकार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित भगिनींना हळदीकुंकू लावून स्नेहभोजन देण्यात आले. मोठ्या संख्येने झालेली उपस्थिती आणि महिलांचा उत्साह पाहता, हा कार्यक्रम औंध जिल्हा परिषद गटासाठी विकासाच्या नव्या पर्वाची नांदी ठरत असल्याचे चित्र दिसून आले.
