प्रतिनिधी-नागेश पवार
कल्याण :- श्री मलंगगड येथील सुप्रीम सुयोग फ्ल्युनिक्युलर रोपवेज प्रकल्पाचे उद्घाटन भाजपचे आमदार किसन कथोरे व सुलभाताई गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या उद्घाटन सोहळ्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख अॅड. रोहिदास मुंडे यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. सत्ताधारी महायुतीतील वेगवेगळ्या घटक पक्षांचे प्रतिनिधी एकाच व्यासपीठावर दिसले, मात्र या कार्यक्रमात जाणीवपूर्वक काही राजकीय चेहरे दूर ठेवण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विशेष म्हणजे, शिंदे गटाचे स्थानिक खासदार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना या उद्घाटन कार्यक्रमाचे आमंत्रणच देण्यात आले नाही. श्री मलंगगडसारख्या महत्त्वाच्या धार्मिक व पर्यटनस्थळावरील प्रकल्पाच्या उद्घाटनातून त्यांना पूर्णपणे लांब ठेवण्यात आल्याने, सत्ताधारी पक्षांमधील अंतर्गत श्रेयवाद उघडपणे समोर आला आहे.
दोन्ही पक्ष सत्तेत असतानाही या रोपवे प्रकल्पाचे श्रेय कोण घेणार, या वादात भाजपने स्पष्टपणे बाजी मारल्याचे चित्र दिसून आले. उद्घाटनावर भाजपच्या नेतृत्वाचा वरचष्मा, कार्यक्रमाचे नियोजन आणि निमंत्रणांची निवड पाहता, सत्ताधारी गटातील वर्चस्वाची लढाई आता उघड राजकीय रंग घेत असल्याचे स्पष्ट होते.
श्री मलंगगड रोपवे प्रकल्प हा विकास आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असला, तरी त्याचे उद्घाटन हे विकासापेक्षा सत्ताधारी पक्षांमधील श्रेययुद्धाचे व्यासपीठ ठरल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व राजकीय निरीक्षकांमध्ये व्यक्त होत आहे.
