ठाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी,विकी जाधव
कल्याण,आज रोजी दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी ग्रामपंचायत वसत–शेलवली येथे ५% अपंग निधीचे वाटप करण्यात आले. सदर निधी हा सन २०२२–२३, २०२३–२४ व २०२४–२५ या तीन आर्थिक वर्षांचा एकत्रित निधी असून, अपंग लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा निधी अखेर प्राप्त झाला आहे.
हा निधी दीर्घकाळ प्रलंबित असून, अपंग नागरिकांच्या हक्क व अधिकारांसाठी पत्रकार विकी कुंडलिक जाधव यांनी वारंवार ग्रामपंचायत कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याची दखल घेत सरपंच श्री. रविंद्र सिताराम भोईर यांनी सदर विषय गांभीर्याने हाताळत अपंग नागरिकांना त्यांचा कायदेशीर हक्क मिळवून दिला, हे विशेष उल्लेखनीय आहे.
निधी वाटपाच्या वेळी सरपंच श्री. रविंद्र सिताराम भोईर, उपसरपंच जयश्री मार्के, ग्रामसेविका पुनम मॅडम गंगे, तसेच ग्रामपंचायत सदस्य विजय गोरे, रुपेश जाधव, भास्कर भोईर, उषाताई हरणे, जिजाबाई भोईर, छाया गोरे, अंजना मुकणे आदी मान्यवर उपस्थित होते. योजनेचे ग्रामस्थ लाभार्थीही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अपंग नागरिकांच्या न्यायहक्कासाठी झालेला हा निर्णय पारदर्शक प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या सकारात्मक भूमिकेचे उदाहरण ठरत असून, भविष्यातही अशा योजनांचा लाभ वेळेत मिळावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

