⭕ ॲड.रोहिदास मुंडे, ज्योती पाटील,योगेश निकम यांच्याकडून जनतेला विकासाची ठाकरेंची गॅरंटी
⭕ शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील व कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित…
दिवा : दिवा शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि येथील मूलभूत प्रश्न कायमचे सोडवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने प्रभाग क्र. २८ साठी आपले अधिकृत ‘गॅरंटी कार्ड’ प्रसिद्ध केले आहे. ‘मनामनात संकल्प नवा, मशाल पेटवू घडवू नवा दिवा’ असा नारा देत पक्षाने पाणी, आरोग्य, शिक्षण आणि नियोजित विकासाचा रोडमॅप मतदारांसमोर ठेवला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या प्रभाग क्रमांक २८ च्या उमेदवार ज्योती राजकांत पाटील व ॲड.रोहिदास मुंडे, योगेश निकम यांनी किती वेळा मध्ये कोणकोणत्या समस्या सोडवणार याची गॅरंटी जनतेला दिली आहे. शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील, उपनेते व कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत,ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, कल्याण लोकसभा सहसंपर्कप्रमुख संतोष जाधव, जिल्हा संघटक अभिजीत सावंत, युवा जिल्हा अधिकारी प्रतीक पाटील यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला.
आरोग्य आणि स्वच्छता : पहिल्या वर्षात हॉस्पिटलचे आश्वासन
दिवा शहरातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी निवडून आल्यानंतर पहिल्या वर्षातच सुसज्ज हॉस्पिटल सुरू करण्याची हमी देण्यात आली आहे. जोपर्यंत हक्काची जागा मिळत नाही, तोपर्यंत भाडेतत्त्वावर जागा घेऊन माता-भगिनींसाठी प्रसूती कक्ष आणि लहान मुलांसाठी अतिदक्षता विभाग (ICU) तातडीने सुरू केला जाईल. तसेच, पहिल्या सहा महिन्यांत ‘महास्वच्छता अभियान’ राबवून ड्रेनेज आणि कचऱ्याची समस्या मुळापासून उपटून टाकण्याचे आश्वासन दिले आहे.
पाणी माफियांची दादागिरी संपवणार ; अधिकृत नळ कनेक्शन देणार
दिवा शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र साठवण टाकी उपलब्ध करून दिली जाईल. विशेष म्हणजे, नागरिकांना अधिकृत नळ कनेक्शन दिले जातील, ज्यामुळे अनधिकृतपणे पैसे उकळणाऱ्या पुढाऱ्यांच्या व्यवसायाला चाप बसेल आणि सर्वसामान्यांच्या पैशांची बचत होईल, असा दावा या गॅरंटी कार्डमध्ये करण्यात आला आहे.
शिक्षण, महिला आणि तरुण : सर्वांगीण विकासावर भर
अभ्यासिका : स्पर्धा परीक्षा (UPSC, MPSC) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भव्य अभ्यासिका उभारली जाईल.
महिला केंद्र : महिलांच्या तक्रारींसाठी ‘माँ साहेब मिनाताई ठाकरे महिला तक्रार निवारण केंद्र’ आणि रोजगारासाठी ‘महिला बचत भवन’ उभारण्याचे नियोजन आहे.
बहुउद्देशीय सभागृह : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने भव्य बहुउद्देशीय सभागृह बांधले जाईल.
नियोजित शहर आणि पायाभूत सुविधा
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठाण्याच्या धर्तीवर ‘पी वन – पी टू’ (P1-P2) पार्किंग धोरण राबवले जाईल. रस्त्यावरील फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र ‘फेरीवाला झोन’ आणि मच्छी-भाजी मार्केटसाठी हक्काची जागा देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या जमिनींवरील अन्यायकारक आरक्षणे रद्द करून भूमिपुत्रांना न्याय देण्याचे वचन पक्षाने दिले आहे.
सांस्कृतिक वारसा आणि मनोरंजन:
स्थानिक आगरी-कोळी संस्कृतीसह संपूर्ण महाराष्ट्राची कला-संस्कृती जोपासण्यासाठी ‘महाराष्ट्र दालन’ उभारले जाईल. याशिवाय, शहरातील तलावांचे सुशोभीकरण करून तेथे नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, नाट्यगृह आणि जॉगिंग ट्रॅक यांसारख्या सुविधा निर्माण केल्या जातील.
मतदानाचे आवाहन आणि उमेदवार:
प्रभाग क्र. २८ मधील विकासाचा हा रथ ओढण्यासाठी शिवसेनेने (उबाठा) आपले तीन शिलेदार मैदानात उतरवले आहेत:
१. निकम योगेश गौतम (प्रभाग २८ – अ)
२. पाटील ज्योती राजकांत (प्रभाग २८ – ब)
३. ॲड. रोहिदास बामा मुंडे (प्रभाग २८ – ड)
या सर्व उमेदवारांची निशाणी ‘मशाल’ असून, येत्या गुरुवार, 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत मतदारांनी आपला हक्क बजावावा, असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे.



