दैनिक चालू वार्ता उपसंपादक – धाराशिव-नवनाथ यादव
धाराशिव/परंडा | प्रतिनिधी
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परंडा मतदारसंघातील राजकारण निर्णायक टप्प्यावर आले आहे. राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा परंडा मतदारसंघाचे आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या हालचालींमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, त्यांच्या एका निर्णयाने संपूर्ण सत्तासमीकरणे उलथापालथ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
आज दुपारी महत्त्वाची बैठक
निवडणुकांची रणनिती ठरवण्यासाठी कंबर कसलेल्या डॉ. सावंत यांनी आज (सोमवार) दुपारी १२ वाजता सोनारी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स येथे शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक केवळ औपचारिक नसून, निवडणूक रणनितीचा आराखडा ठरवणारी ‘गेमचेंजर’ बैठक ठरणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी युती कायम ठेवायची? की स्वबळावर निवडणूक लढवायची,! उमेदवारांची निवड तसेच पुढील राजकीय दिशा याबाबत महत्त्वाचे संकेत मिळण्याची शक्यता आहे.
इच्छुकांमध्ये अस्वस्थता, हालचालींना वेग
परंडा मतदारसंघात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असली, तरी अंतिम निर्णयाचा शिक्का डॉ. तानाजी सावंतांचाच असणार, हे आता उघड सत्य झाले आहे. परिणामी इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.
‘स्वबळ’ की ‘युती’—निर्णय कुणाच्या बाजूने?
डॉ. सावंत यांचा परंडा, भूम व वाशी तालुक्यांत भक्कम जनाधार असून, त्यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर निवडणूक लढवण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत स्वबळाचा आक्रमक निर्णय घेतला जाणार की विद्यमान युती कायम राहणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
एक निर्णय… अनेकांचे राजकीय भवितव्य!
डॉ. तानाजी सावंत यांच्या निर्णयावरच अनेक इच्छुकांचे राजकीय भवितव्य ठरणार असल्याने आजची बैठक अत्यंत निर्णायक मानली जात आहे.
परंडा मतदारसंघातील सत्तासमीकरणे बदलण्याची ताकद या बैठकीत आहे, हे मात्र निश्चित!
