पालघर प्रतिनिधी: मिलिंद चुरी
पालघर :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांदरम्यान कॉपीमुक्त, पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी विशेष ‘कॉपीमुक्त अभियान’ प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात मुंबई विभागीय मंडळाच्या विभागीय सचिवांनी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सविस्तर मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहेत.
या अभियानाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक पाटील यांनी संयुक्तपणे शाळा प्रशासन, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध सहभागाचे आवाहन केले आहे.
इयत्ता बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६, तर इयत्ता दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. या परीक्षांदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये, यासाठी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे, दक्षता पथके आणि केंद्रस्तरीय यंत्रणा अधिक सक्रीय ठेवण्यात येणार आहेत.
कॉपीमुक्त अभियानांतर्गत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान करावयाच्या व टाळावयाच्या बाबींची सविस्तर माहिती देणे, पालक–विद्यार्थी सभा घेऊन शिक्षा सूची समजावून सांगणे तसेच अफवांपासून दूर राहण्याबाबत जनजागृती करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मोबाईल, इलेक्ट्रॉनिक साधने, चिठ्ठ्या किंवा कोणतेही अनधिकृत साहित्य परीक्षा केंद्रात नेण्यास सक्त मनाई करण्यात आली असून शाळांनी आवश्यक सुविधा, शिस्त आणि पर्यवेक्षण काटेकोरपणे राबवावे, असे शिक्षण विभागाने कळविले आहे.
दरम्यान, परीक्षा केंद्रांवर स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे, योग्य प्रकाश व बैठक व्यवस्था तसेच सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी संतुलित आहार, पुरेशी झोप आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देत तणावमुक्तपणे परीक्षेला सामोरे जावे, असेही प्रशासनाने आवाहन केले आहे.
परीक्षांबाबत कोणतीही माहिती आवश्यक असल्यास विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता संबंधित शाळेचे मुख्याध्यापक किंवा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याशी थेट संपर्क साधावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
चौकट
“सर्व शाळा, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी प्रशासनाला सहकार्य करून कॉपीमुक्त व पारदर्शक परीक्षा यशस्वी करावी. भयमुक्त वातावरणात विद्यार्थी आपली गुणवत्ता सिद्ध करतील, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.”
मनोज रानडे
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद पालघर
