दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रताप नागरे
वाशिम
“हर घर जल” या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशनची वाशिम जिल्ह्यातील प्रत्यक्ष परिस्थिती मात्र चिंताजनक असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी पो. भुली (ता. मनोरा) परिसरात महिन्याभरापासून नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर अवलंबून राहावे लागत आहे. विशेष म्हणजे नळ योजना असूनही नियमित पाणीपुरवठा होत नसताना नागरिकांकडून मात्र मासिक पाणीपट्टी वसूल केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या गंभीर प्रकाराबाबत श्री. प्रविण रमेश राठोड यांनी केंद्र शासनाच्या CPGRAMS पोर्टलवर (नोंदणी क्र. DODWS/E/2026/0000458, दिनांक १५ जानेवारी २०२६) तक्रार दाखल केली होती. तक्रारीत नळयोजनेतील गळती, पाईपलाईन फुटणे आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे.
या तक्रारीची दखल घेत राज्य पाणी व स्वच्छता मिशन (SWSM) कार्यालय, मुंबई यांनी थेट जिल्हा परिषद वाशिमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधित तक्रारीवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल ठरावीक मुदतीत सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
तरीही प्रत्यक्षात मात्र गावात पाण्याची समस्या जैसे थेच असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. “योजना पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखवले जाते, पण नळाला थेंबही येत नाही. पाणी नाही तरी बिल मात्र नियमित येते,” असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
जलजीवन मिशनसारख्या कोट्यवधींच्या योजनेत अशा प्रकारची बेपर्वाई होत असेल तर जबाबदार कोण? प्रशासन आदेशांची अंमलबजावणी करणार की नागरिकांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागणार? असा प्रश्न आता वाशिमकरांच्या मनात निर्माण झाला आहे.
