दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रताप नागरे
वाशिम
नापिकी, कर्जबाजारीपणा आणि अस्मानी संकटांनी हैराण झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबांवर कोसळणारे दुःख आणि उपेक्षा ही शासनासाठी कायमची चिंतेची बाब ठरत आहे. अशा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना केवळ सांत्वन नव्हे, तर प्रत्यक्षात शासकीय योजनांचा भक्कम आधार मिळणे गरजेचे आहे, अशा स्पष्ट शब्दांत वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) अॅड. निलेश हेलोंडे पाटील यांनी प्रशासनाला निर्देश दिले.
मानोरा तालुक्यातील इंझोरी (इझोरी) येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची त्यांनी सोमवारी (दि. १९) प्रत्यक्ष घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. डिगांबर गजानन इंगळे व शाम तुळशीराम शिंदे या दोन शेतकऱ्यांनी काही वर्षांपूर्वी नापिकी व कर्जाच्या विळख्यात सापडून आत्महत्या केली होती. त्यांच्या पश्चात राहिलेल्या कुटुंबीयांची सद्यस्थिती जाणून घेत अॅड. हेलोंडे यांनी त्यांच्या समस्या, उदरनिर्वाहाची साधने आणि मुलांच्या शिक्षणाविषयी सविस्तर चर्चा केली.
यावेळी स्व. शाम शिंदे यांच्या पत्नी संगीता शिंदे, दोन मुली व मुलगा, तसेच स्व. डिगांबर इंगळे यांच्या पत्नी शितल इंगळे व त्यांच्या मुलांशी संवाद साधताना अॅड. हेलोंडे यांनी शासनाने जाहीर केलेल्या योजना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, अशी ठाम भूमिका मांडली.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वावलंबन मिळावे, यासाठी
– मुलांच्या शिक्षणासाठी शासकीय शैक्षणिक लाभ तातडीने मंजूर करणे,
– शेतीसाठी विहीर व पाईपलाईनची सुविधा उपलब्ध करून देणे,
– महिलांना अर्थार्जनासाठी पशुपालन व शिलाई मशीन देणे,
– दोन्ही कुटुंबांना हक्काचे घरकुल उपलब्ध करून देणे,
यासह सर्व योजनांना प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
या दौऱ्याप्रसंगी प्रभारी तहसीलदार उमेश बनसोड, गटविकास अधिकारी सुधाकर जाधव, तालुका महिला व बालकल्याण अधिकारी अनुप कदम, तालुका कृषी अधिकारी उमेश राठोड, ग्रामविकास अधिकारी सुरेश चव्हाण उपस्थित होते. तसेच पत्रकार राजू ठाकरे, सरपंच मनीषाताई दिघडे, माजी सरपंच हिम्मत राऊत यांच्यासह ग्रामस्थ व विविध विभागांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आत्महत्येने संपणारी शेतकऱ्यांची कहाणी इथेच थांबू नये, तर त्यांच्या कुटुंबांना सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, हा संदेश या भेटीतून अधोरेखित झाला आहे.
