दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी : तुषार नाटकर–
छ. संभाजीनगर (पैठण) : पैठण तालुक्यातील गांगलवाडी (पुनर्वसित) येथील सुपुत्र बॅ. महेश सिमा प्रभाकर आडसुळ यांनी इंग्लंडमधील नामांकित लीड्स युनिव्हर्सिटी येथून क्रिमिनॉलॉजी अँड क्रिमिनल जस्टिस (गुन्हे शास्त्र) या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत विद्यापीठाच्या टॉप टेनमध्ये प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे पैठण तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्वल झाले आहे.
साध्या कुटुंबातून आलेल्या महेश आडसुळ यांनी कठोर परिश्रम, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर हे यश मिळवले आहे. परदेशात शिक्षण घेत असताना शैक्षणिक अभ्यासाबरोबरच संशोधनात्मक दृष्टिकोन, कायदा व समाजव्यवस्थेचा सखोल अभ्यास करत त्यांनी उत्कृष्ट गुणांसह मास्टर्स पदवी संपादन केली. विशेष म्हणजे त्यांनी विद्यापीठातील अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये अव्वल स्थान पटकावल्याने त्यांच्या कार्याची दखल शैक्षणिक वर्तुळात घेण्यात आली आहे.
आई-वडिलांचे स्वप्न साकार करत महेश आडसुळ यांनी इंग्लंडमध्ये शिक्षण पूर्ण करून नुकतेच मायदेशी परतले आहेत. त्यांच्या या यशामुळे आडसुळ परिवारासह संपूर्ण गांगलवाडी गावात आणि पैठण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे यश केवळ कुटुंबापुरते मर्यादित नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या यशानिमित्त गुरुवारी पैठण शहरातील दुर्गा गार्डन लॉन्स येथे आडसुळ परिवाराच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास नातेवाईक, मित्रमंडळी, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी बॅ. महेश सिमा प्रभाकर आडसुळ यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
महेश आडसुळ यांच्या या यशामुळे पैठण तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा मिळाली असून, भविष्यात देशसेवा व समाजहिताच्या कार्यात ते मोलाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
