दै. चालु वार्ता, पैठण प्रतिनिधी, तुषार नाटकर-
पैठण : शेती व कृषीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून शेतकरी वर्गाच्या आर्थिक उन्नतीसाठी उल्लेखनीय व सातत्यपूर्ण कार्य करणाऱ्या पैठण शहरातील प्रतिष्ठित व्यापारी तथा कृषी सल्लागार उमेश तट्टू यांना कृषी माऊली पुरस्कार– 2026 प्रदान करण्यात आला. श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित), नाशिक येथे आयोजित जागतिक कृषी महोत्सवात हा भव्य पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. कृषीपूरक व्यवसाय क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व आधार देण्याचे कार्य केल्याबद्दल उमेश तट्टू यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. परमपूज्य गुरुमाऊली मोरे दादा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्र मनी, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे (देऊळ बंद), तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, कृषी संयोजक आकाश तरते, बाबासाहेब शिंदे यांच्यासह कृषी, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कारामुळे कृषीपूरक व्यवसायाचे महत्त्व अधोरेखित झाले असून, शेतीला पूरक उद्योगांकडे शेतकरी व युवकांचा वाढता कल दिसून येत आहे. हा सन्मान म्हणजे केलेल्या कार्याची पोचपावती असून, तो इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. या यशाबद्दल आमदार विलासबापू भुमरे, सरपंच शिवराज भुमरे, कृषी अधिकारी राधाकिसन कारले, परिसरातील शेतकरी वर्ग, व्यापारी बांधव तसेच सुरेश जाधव यांनी उमेश तट्टू यांचे अभिनंदन केले.
