फुलसावंगी प्रतिनिधी -अजय पाचंगे
फुलसावंगी –
येथील ग्रामपंचायतच्या मालकीच्या वार्ड क्रमांक ४ मधील शासकीय प्लॉटवरील अतिक्रमण प्रकरणी अखेर प्रशासनाने ठोस भूमिका घेतली आहे. सदर प्लॉटवर न्यायालयाने सन २०२४ मध्ये ग्रामपंचायतच्या बाजूने निकाल दिलेला असतानाही अवैध बांधकाम व टिनाचे शेड हटविण्यात विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.
या पार्श्वभूमीवर दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर रवी भोजने, कामरान खान, ओम घोडे व विनोद कृष्णापुरे यांच्या कडुन उपोषण करण्यात आले होते. उपोषणकर्त्यांनी यापूर्वी दि. १६/०१/२०२६ रोजी याबाबत लेखी अर्ज सादर केला होता. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात आला.
या उपोषणाची गंभीर दखल घेत ग्राम विकास अधिकारी विनोद चव्हाण, सरपंच सारजाबाई वाघमारे, उपसरपंच कुणाल नाईक व ग्रामपंचायत सदस्यांनी उपोषणस्थळी भेट देत चर्चा केली. यावेळी ३० जानेवारी २०२६ रोजी ग्रामपंचायतच्या मालकीच्या प्लॉटवरील अतिक्रमण हटविण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
या वेळी विजयराव महाजन, बळवंत दळले, वसंता भिसे, शमशेर खान, बापुराव व्हडगिरे, अनुप नाईक, विनोद कांबळे, रितेश बाजपेयी, योगेश वाजपेयी, अमरदीप दळवे, मधुकर पेंढारकर, यादव वाघमारे, इकबाल पठाण, मनिष ढाले, शैलेश वानखेडे, तसलीम शेख, बिट जमादार सुहास कामटे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
नागरिकांच्या एकजुटीमुळे आणि लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने गावात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. निश्चित तारखेला अतिक्रमण हटविले जाईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
