फुलसावंगी प्रतिनिधी -अजय पाचंगे
यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या उपक्रमा अंतर्गत,दराटी पोलीस स्टेशन कडुन प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्राम भवानी ता. उमरखेड येथील पोलीस पाटील सुदर्शन हौसाजी कवाने यांना त्यांच्या उत्कृष्ट व जबाबदार सेवेसाठी प्रथम क्रमांकाचे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
सन २०२५ या कालावधीत पोलीस पाटील पदावर कार्यरत असताना सुदर्शन कवाने यांनी भवानी व चिखली गावांमध्ये नागरिकांशी सतत संपर्क ठेवत गणपती उत्सव, दुर्गा उत्सव, निवडणुका तसेच विविध सण-उत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी मोलाचे योगदान दिले. कोणताही अनुचित प्रकार घडू न देता त्यांनी वेळोवेळी त्या त्या वेळेच्या पोलीस स्टेशन दराटी येथील अधिकारी व अंमलदारांशी समन्वय साधत उत्कृष्ट कर्तव्य बजावले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पोलीस स्टेशन दराटीचे ठाणेदार प्रसेनजित चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. या गौरवामुळे ग्राम भवानी परिसरात आनंदाचे वातावरण असून, ग्रामस्थांकडून सुदर्शन कवाने यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
